esakal | पुण्याजवळील घाटमाथ्याला ‘ऑरेंज अलर्ट’
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain Raincoat Umbrella IMD Maharashtra

पुण्याजवळील घाटमाथ्याला ‘ऑरेंज अलर्ट’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि परिसरातील घाट भागात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे येत्या मंगळवारपासून (ता. 7) गुरुवारपर्यंत (ता. 9) घाट भागात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला.

पुण्यात गेल्या तीन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांमध्ये शिवाजीनगर येथे 15.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लोहगाव येथे 25.8 मिलिमीटर पडला. पाषाणमध्ये 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे दोन मिलिमीटर पाऊस पडला.

कोंढव्यात मुसळधार, शहरात हलक्या सरी

बोपदेव घाटाचा परिसर आणि कोंढव्याच्या भागात रविवारी दुपारी मुसळधार सरी पडल्या. पावसाचा जोर इतका मोठा होता की, पंधरा मिनिटांमध्येच रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहू लागले. कात्रज चौकापर्यंत हा पाऊस पडत होता. तेथूनन सिंहगड रस्ता, सातारा रस्ता भागात पावसाचा जोर कमी होता. शहरात दुपारनंतर शहराच्या मध्य वस्तीतील पेठांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

पुण्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी

शहरात 1 जून ते 5 सप्टेंबर दरम्यान सरासरी 454.2 मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी या दरम्यान आतापर्यंत 403.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा 50.6 मिलिमीटर पाऊस कमी झाला असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला विशेष अधिकार दिलेत का? चित्रा वाघ यांचा सवाल

राज्यात पाऊस सक्रीय

राज्यात पावसाला पुन्हा सुरवात झाली आहे. रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान यामुळे उकाड्यातही वाढ झाली होती. राज्याच्या विविध भागांत शनिवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. काही जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांसह जोरदार सरी पडल्या. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.

मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे सर्वाधिक १४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, नगर जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

loading image
go to top