पुणे : अवैध फ्लेक्स काढण्याची कारवाई करण्यास टाळाटाळ

चमकोगिरीसाठी फ्लेक्स लावणाऱ्यांचे उद्योग सुरूच असले तरी अशा फ्लेक्सबहाद्दरांवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालये अजूनही ढिम्मच आहे.
Hording
HordingSakal
Summary

चमकोगिरीसाठी फ्लेक्स लावणाऱ्यांचे उद्योग सुरूच असले तरी अशा फ्लेक्सबहाद्दरांवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालये अजूनही ढिम्मच आहे.

पुणे - चमकोगिरीसाठी फ्लेक्स (Flex) लावणाऱ्यांचे उद्योग सुरूच असले तरी अशा फ्लेक्सबहाद्दरांवर कारवाई (Crime) करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालये अजूनही ढिम्मच आहे. शहराच्या विविध भागात अजूनही फ्लेक्स कायम असून, दंडात्मक कारवाई करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत तब्बल ३ हजार ९३७ बेकायदा फ्लेक्स (Illegal Flex) दिसून आले होते. पण क्षेत्रीय कार्यालयांकडून केलेल्या कारवाई फ्लेक्स, बॅनर, पोस्टर असे केवळ २ हजार २१२ वरच कारवाई केली आहे. तर केवळ ९ हजाराचा दंड जमा झाला आहे. त्यामुळे फ्लेक्सबाजीला क्षेत्रीय कार्यालयांकडूनच अभय दिले जात असल्याचे समोर आले आहे.

एकीकडे पुणे शहराचा स्वच्छ भारत अभियानात पहिला नंबर आणायचा आहे, सेव्हन स्टार रॅंकिंग मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असा दावा प्रशासनाकडून वारंवार केला जात आहे. तर दुसरीकडे चौकाचौकात, रस्त्यावर, पादचारी मार्गावर अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. यावर कारवाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये बिगारी, परवाना निरीक्षक, सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी आहे. वेळेवर कारवाई केली जात नसल्याने फ्लेक्सबाजीला ऊत आला आहे. दादा, मामा, काका, साहेब, अण्णा, भाऊ, बंटी, बबल्या, ताई, माई, वाहिनी अशांच्या वाढदिवसाचे, निवडणुकीच्या प्रचाराचे फ्लेक्स लावले जात आहेत. एकाच वेळी एकाच रस्त्यावर ओळीने अनधिकृत फ्लेक्स लावले तर कारवाईची जबाबदारी असणारे अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहर बकाल होत आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही याकडे लक्ष दिले जात नाही.

‘सकाळ’ने गेल्या फ्लेक्सबाजी विरोधात मोहीम सुरू करून त्यामध्ये नागरिकांनाही सहभागी करून घेतले. शेकडो पुणेकरांनी त्यांची संतप्त भावना ‘सकाळ’कडे व्यक्त करत राजकीय पुढारी आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. यामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून कारवाई केली जात आहे असा दावा वरिष्ठ अधिकारी करत आहेत. मात्र, १५ क्षेत्रीय कार्यालये ढिम्मच आहेत. प्रमुख रस्त्यावरील फ्लेक्स काढून टाकले जात असून, अंतर्गत रस्त्यावरील, गावठाणातील फ्लेक्स काढलेले नाहीत.

या भागात आहेत फ्लेक्स...

मार्केट यार्ड परिसरातील टपाल कार्यालय चौक, बस डेपो, गंगाधाम चौक, सॅलिसबरी पार्क, भारती विद्यापीठ, संतोषनगर, कात्रजगाव, सुखसागरनगर, येवलेवाडी, गुजरनिंबाळकरवाडी, कोंढवा, गोकुळनगर येथील फ्लेक्स काढलेले नाहीत. धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत त्रिमूर्ती चौक, शरदचंद्र बहुउद्देशीय भवन, कानिफनाथ चौक, धनकवडी शेवटचा बसथांबा, चैतन्यननगर, गुलाबनगर येथे छोटेमोठे बॅनर, फ्लेक्स आहेत. वानवडी- रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रामटेकडी, वैदूवाडी, गोसावी वस्ती, शंकर मठ, राम नगर, आनंदनगर, वैदुवाडी-ससाणेनगर रस्ता येथील फ्लेक्स कायम आहेत.

औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत औंध गावठाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मेडीप्वाईंट चौक, बाणेर फाटा, म्हाळुंगे गावठाण, हभप सायकर चौक, महाबळेश्‍वर हॉटेल, साई चौक येथे फ्लेक्स आहेत. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत हांडेवाडी चौक, श्रीराम चौक, मोहम्मदवाडी चौक, उंड्री चौक, होलेवस्ती, कात्रज बायपास, सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने सिंहगड रस्त्यावरील धायरी पर्यंतचे फ्लेक्स काढले पण किरकटवाडी, नांदोशी, धायरी, नऱ्हे या भागातील कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. फुरसुंगी येथे भेकराईनगर चौक, तुकाईनगर चौक, शिवशक्ती चौक, मंतरवाडी चौकातील फ्लेक्स काढलेले नाहीत.

यासह शहराच्या इतर भागातही मोठ्याप्रमाणात फ्लेक्स आहेत. पण महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांनी तीन दिवसात केळ २ हजार २२१२ फ्लेक्स काढून टाकले आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

कोठेही अतिरेक, नियमांचे उल्लंघन, विद्रूपीकरण होणार नाही आणि महानगरपालिका, नगरपालिका यांचे योग्य ते पैसे भरून जाहिरात करावी. माहिती म्हणून असे फ्लेक्स एक दोन दिवस ठेवावेत आणि न विसरता काढावेत. शहरातील काही भागात मागील दिवाळीचे फ्लेक्स अजून वेडेवाकडे लटकलेले दिसतात, असे होता कामा नये. प्रत्येकाने स्वयंम शिस्त पाळली तर अवघड काहीच नाही.शहरात काही राजकीय पुढारी माझ्या पाहण्यात आहेत, जे कधीच फ्लेक्स बाजी करत नाहीत, पण त्यांच्या कामाची दखल मात्र सर्व घेतात.

- अशोक येवले, केशवनगर, मुंढवा

प्रसिद्धीची हौस, तर कधी वाढदिवस, उद्‍घाटन यासाठी फ्लेक्स लावले जातात. नियमात राहून फ्लेक्स लावणे हा उत्पन्नाचा भाग आहे. परंतु चमकोगिरी व अडेलतट्टूपणामुळे फ्लेक्स लावण्याची स्पर्धा लागते. फ्लेक्सचे लोन शहरा पुरतेच मर्यादित न राहता त्याचे लोण ग्रामीण भागातही पसरलेले आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडते ते वेगळेच. फ्लेक्स किती आकाराचे असावे? या बाबत नियमावली असूनही बरेच जण मनमानी पद्धतीने फ्लेक्स लावतात व शहराला विद्रूप करतात.

- राजन बिचे, बिबवेवाडी

क्षेत्रीय कार्यालय - फ्लेक्सवर कारवाई - दंडाची रक्कम

नगर रस्ता - ८८ - ००

येरवडा - १०२ -००

ढोले पाटील - ८६ - १०००

औंध बाणेर - १३६ - ००

शिवाजीनगर - १४३ - १०००

कोथरूड - १८४ - ००

धनकवडी - ११५ - ००

सिंहगड रस्ता - १८८ - २०००

वारजे - ००० -०००

हडपसर -१९५ -००

वानवडी - ३२७ - ००

कोंढवा - १५७ - ००

कसबा - ७७ - ५०००

भवानी पेठ - २७३ -००

बिबवेवाडी - १४१ - ००

एकूण - २२१२ - ९०००

अनधिकृत फ्लेक्स काढण्यासाठी महापालिका सव्वा कोटी रुपयांची निविदा काढणार आहे. पण नागरिकांच्या कररूपी पैशाचा वापर बेकायदा गोष्टीसाठी वापरला जात आहे. ही निविदा काढण्यापेक्षा दंड वसूल झालाच पाहिजे, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तरच हे प्रमाण कमी होईल.

- संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच

वारज्यात शून्य कारवाई

वारजे, कर्वेनगर भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स लागलेले आहेत. पण गेल्या तीन दिवसांत या भागातील फ्लेक्स, बोर्ड, बॅनर, पोस्टर यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे या कार्यालयाची उदासीनता समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com