esakal | पुणे-बारामती लोहमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Baramati-Survey

पुणे-बारामती लोहमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण

sakal_logo
By
सचिन बडे

पुणे - मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेले पुणे ते बारामती नवीन लोहमार्गाचे सर्वेक्षण जानेवारीत पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणानुसार लोहमार्गाच्या कामासाठी सुमारे एक हजार दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून रेल्वे बोर्डाला मंजुरीसाठी पाठविला आहे. हा मार्ग पुणे- सासवड-जेजुरी-मोरगावमार्गे बारामती असा आहे. पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ या लोहमार्गाने जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे.

पुणे-बारामती नवीन लोहमार्गाच्या सर्वेक्षणासाठी २०१४-१५ च्या अर्थ संकल्पामध्ये ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

त्यानंतर या मार्गाचे मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागामार्फत एका खासगी कंपनीने सर्वेक्षण केले आहे. सुमारे चार वर्षांमध्ये सहा प्रकारे सर्वेक्षण करून जानेवारी २०१९ मध्ये लोहमार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतरच प्रत्यक्षात कामास प्रारंभ होणार आहे. हा लोहमार्ग झाल्यास पुणे ते बारामती दरम्यानचे अंतर कमी होणार आहे. तसेच हा लोहमार्ग नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळून जात असल्याने पुणे आणि बारामती दोन्ही शहरे विमानतळास जोडली जाणार आहेत. हा नवीन लोहमार्ग हडपसर रेल्वे स्थानकावरून सासवड मार्गे जेजुरी स्थानकाला जोडला जाणार असून जेजुरीवरून पुढे मोरगावमार्गे बारामतीला जाणार आहे. या मार्गाच्या कामासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी सतत पाठपुरावा केला आहे.

‘बारामती स्थानकाला शरद पवारांचे नाव द्यावे’
पुणे-बारामती नवीन लोहमार्गाचे शेवटचे स्थानक हे बारामती शहराच्या बाहेर होणार असून, त्या स्थानकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी रेल्वेच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीने (डीआरसीसी) केली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव समितीने पुणे रेल्वे विभागाला दिला असल्याचे समितीचे सदस्य महेंद्र जगताप यांनी सांगितले. या प्रस्तावावर विचार केला जाईल असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे ते बारामतीसाठी सासवड-जेजुरी-मोरगावमार्गे बारामती लोहमार्गासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतःहून लक्ष घातलेले आहे. त्यांच्या पुढाकारानेच मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. या मार्गामध्ये शेतकऱ्यांच्या कमीत कमी जमिनी जातील त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला आहे. मार्गामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
- महेंद्र जगताप, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती

सासवड-मोरगावमार्गे पुणे ते बारामती नवीन लोहमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे हा अहवाल आलेला आहे. मात्र त्यातील काही गोष्टींवर विचार करण्यात येत आहे. त्यानंतर हा अहवाल मंजुरीसाठी पाठविला जाईल.
- मिलिंद देऊस्कर, रेल्वे विभागीय व्यवस्थापक, पुणे

loading image
go to top