#TomorrowsPune पुण्यातच निर्माण होणार नवे पुणे

#TomorrowsPune पुण्यातच निर्माण होणार नवे पुणे

पुणे - शहरात मेट्रोपाठोपाठ उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गालाही (एचसीएमटीआर) ट्रान्झिट ओरिएंटेड झोनचा (टीओडी) दर्जा देण्याची शिफारस महापालिकेने केल्यामुळे  ९० किमी मार्गाभोवती उंच इमारतींमधील घरांची संख्या वाढून त्यात किमान ७६ लाख नागरिक राहू शकतील एवढी क्षमता निर्माण होणार आहे. ‘टीओडी’च्या नियमाप्रमाणे चौपटऐवजी तिप्पट जरी बांधकाम केले, तरीदेखील सध्याच्याच पुण्यात एक नवे पुणे शहर निर्माण होणार आहे.

मेट्रोचा प्रकल्प आराखडा तयार करताना मेट्रो मार्गाच्या दुतर्फा ५०० मीटर क्षेत्रात ४ एफएसआय देण्यात येईल, असे म्हटले होते. त्यामुळे मार्गाभोवती नव्या घरांची निर्मिती होईल आणि त्यातून मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी प्रवासी उपलब्ध होतील, असा विचार होता. या सूत्रानुसार मेट्रो प्रकल्प मंजूर झाला. मात्र, अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा महापालिकेने मेट्रो मार्गाभोवती सरसकट चार एफएसआय देण्याऐवजी मेट्रोच्या स्थानकांभोवतीच ५०० ते ८०० मीटर क्षेत्रात चार एफएसआय देण्यात यावा, अशी शिफारस राज्य सरकारला नुकतीच केली आहे. त्याबाबतचा निर्णय सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच आता ‘एचसीएमटीआर’चा समावेश करण्याची शिफारस महापालिकेने केली आहे.

चार एफएसआय मंजूर झाला असला, तरी प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी तो तीनपर्यंतच एफएसआय वापरता येणार आहे. कारण रस्त्याच्या रुंदीच्या प्रमाणात तो वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. अंमलबजावणी सुरू झाल्यावर पुढील पाच वर्षांत टिओडी झोन टप्प्प्याटप्प्याने निर्माण होऊ शकतो.   

टिओडी झोनमुळे पुण्याचा चेहरामोहरा बदलणार असून, एक नवे शहर अस्तित्वात येणार आहे. केवळ घरांची संख्या वाढून उपयोग नाही, तर त्यासाठी पाणी, कचरा-सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, आरोग्य आदी पायाभूत सुविधांचेही जाळे निर्माण करावे लागणार आहे. त्याशिवाय टिओडी झोन मंजूर केल्यास त्याचे शहरावर भीषण दूरगामी परिणाम होतील.
- प्रा. अनिता गोखले, बेनिंझर, संचालक, सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज ॲन्ड ॲक्‍टिव्हिटीज

‘टीओडी’मुळे एफएसआय वाढून घरांचीही संख्या वाढणार आहे. परंतु, पायाभूत सुविधांचे काय? त्या पुरविण्यासाठी ‘क्‍लस्टर पॉलिसी’ आवश्‍यक आहे. ती मंजूर झाल्यावर पायाभूत सुविधा वाढतील अन्‌ टीओडीचा फायदा होईल. अन्यथा गंभीर परिस्थिती होईल. 
- गजेंद्र पवार, बांधकाम व्यावसायिक

‘टीओडी’ म्हणजे काय ?
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, यासाठी वाहतुकीच्या मेट्रो, बीआरटी, एचसीएमटीआर, ट्राम, मोनो रेल आदी पर्यायांसाठी पूरक धोरण म्हणजेच ‘टीओडी’ होय. त्यातंर्गत रस्त्याच्या दुतर्फा ‘एफएसआय’ वाढविल्यास नागरिक तेथे राहतील आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील, अशी अपेक्षा आहे. म्हणून मेट्रो मार्गाच्या दुतर्फा चार ‘एफएसआय’ देण्यात आला आहे.

टिओडी झोनमुळे  असे होणार पुणे 
  ९० किलोमीटरमध्ये - १४४ वर्तुळाकृती चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी चार एफएसआयचा नियम लागू होणार 
  दोन किंवा तीन जरी एफएसआय वापरल्यास २५० हेक्‍टर्स प्रतिकिलोमीटर क्षेत्र निर्माण होणार 
  टिओडी झोनमध्ये एकूण २२ हजार ५०० हेक्‍टर्स क्षेत्र निर्माण होणार 
  प्रतिहेक्‍टर १६० घरे निर्माण होणार; ९० किलोमीटरमध्ये सुमारे ३६ लाख 
निर्माण घरे होतील 
  २०११ च्या जणगणनेनुसार एका घरात ४. २ लोक राहतात. त्यानुसार नव्या घरांतील एकूण लोकसंख्या - 
१ कोटी ५३ लाख 
  निम्म्याच संख्येने घरे अस्तित्वात येतील, असे गृहित धरले , तरी ७६ लाख लोकसंख्या होऊ शकते 
  या लोकसंख्येसाठी रोज पाणी 
लागेल २०२५ एमएलडी 
(दरडोई १३५ लिटरनुसार) 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com