

पुणे, ता. १८ : कोथरूडमधील कामांच्या ऑडिटच्या मागणीवरून महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष झाला. याचा बदला म्हणून भाजपने राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा १२ कोटींचा निधी शून्य केला. ‘आपली मैत्री राज्यात असेल, पुणे महापालिकेत नाही,’ अशा शब्दांत सभागृहनेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादीला सुनावले. दरम्यान, भाजपने हा निर्णय राजकीय वैमनस्यातून घेतल्याचा आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला.
कोथरूड मतदारसंघात पुणे जिल्हा नियोजन समिती, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, तसेच अन्य निधीतून महापालिकेच्या माध्यमातून ३८ लाख १५ हजार ६०० रुपयांची चार कामे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहेत. याचे स्पेशल ऑडिट करावे, असा प्रस्ताव बालवडकर व सुहास टिंगरे यांनी स्थायी समितीपुढे दिला होता. गेल्या आठवड्यात प्रस्ताव दप्तरी दाखल केला. मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांमध्ये मंजूर केलेले ११२ विषय दाखल करण्यासाठी सभागृहात मांडण्यात आले. त्यामध्ये बालवडकर यांचा निधी शून्य करण्याचाही प्रस्ताव होता. त्यामुळे बालवडकर यांनी कायद्याचा आधार घेत प्रत्येक विषय वाचून दाखवावा, अशी मागणी केली. त्यावरून सभागृहनेते बिडकर आणि विरोधी पक्षनेते नीलेश निकम, बालवडकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. बालवडकर ऐकत नसल्याने बिडकर यांनी संतापून आता प्रत्येक विषय वाचायचा आणि तो केवळ दाखल करून मान्य करायचा, अशी भूमिका घेतली.
बालवडकरांना निधी रद्द ः आरोप-प्रत्यारोप
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक नऊमधील विविध विकासकामांसाठीचा निधी रद्द करण्यात आल्याने नगरसेवक अमोल बालवडकर आक्रमक झाले. हा निर्णय भाजपने राजकीय वैमनस्यातून घेतल्याचा आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला, तर याला प्रत्युत्तर देताना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी हे आरोप फेटाळून लावले. एका महत्त्वाच्या अर्थसंकल्प हेडमधून त्यांना वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करून दिला होता. ही चूक स्थायी समितीच्या लक्षात आल्याने हे वर्गीकरण रद्द केले आहे,’’ असे बिडकर यांनी सांगितले.
या निधीतून प्रभागात रस्ते, सांडपाणी, उद्याने आणि इतर मूलभूत सुविधांची कामे नियोजित होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनावर दबाव आणून हा निधी रद्द केला. त्यामुळे नागरिकांच्या हक्काच्या कामांना खीळ बसली आहे. या अडथळ्यांमुळे प्रभागाच्या विकासाची गती थांबणार नाही, असे बालवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बालवडकर यांना दिलेला १२ कोटींचा निधी काढून घेण्याचा प्रस्ताव भाजपने सर्वसाधारण सभेत दाखल केला. या वेळी दोन्ही पक्षांत झालेल्या वादातून बिडकर यांनी ‘आपली मैत्री राज्यात असेल, पुण्यात नाही. यापुढे आमच्याकडून सहकार्याची भूमिका ठेवू नका,’ असे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना ऐकवले. त्यावर ‘असे करणार असाल तर यापुढे सर्व कामे नियमानेच झाली पाहिजेत. ती नियमानेच कशी होतील, याकडे आम्ही लक्ष ठेवू’ असे प्रत्युत्तर नीलेश निकम यांनी दिले. प्रस्तावावर बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी बालवडकर यांनी केली. पण महापौर मंजूषा नागपुरे यांनी परवानगी नाकारली. त्यानंतर नगरसचिवांनी थेट मतदान घेतले. यात भाजपने ७३ विरुद्ध ११ अशा बहुमताने बालवडकर यांचा निधी शून्य करून टाकला. या वेळी काँग्रेसने वादात न पडता तटस्थ भूमिका घेतली.
२००७ मध्ये अरविंद शिंदेंना शून्य तरतूद
पुणे महापालिकेत २००७ मध्ये बापू पठारे हे स्थायी समिती अध्यक्ष होते. त्यावेळचे सभागृह नेते अनिल भोसले यांच्या सांगण्यावरून काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांना अर्थसंकल्पात निधीच दिला नाही. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या प्रभागात फलक लावून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल वाच्यता केली होती. त्याचीच पुनरावृत्ती १९ वर्षांनी महापालिकेत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.