पुणे : पूल नाही तर सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोंडी फोडेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Traffic

पुणे : पूल नाही तर सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोंडी फोडेल

पुणे : खासगी वाहनांचा विचार करून शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर पूल बांधले जात आहेत. मात्र त्यातून कोंडी फुटेलच असे नाही. पुलासाठी करण्यात येणारा खर्च सावर्जनिक वाहतुकीसाठी वापरणे गरजेचे आहे. कारण पूल नाही पण सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाहतूक कोंडी फोडू शकते, असा विश्‍वास वाहतुकीबाबत काम करणाऱ्या शहरातील सामाजिक संस्था आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी कर्वे रस्त्यावर नळस्टॉप चौकात बांधण्यात आलेल्या पुलामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर व्यक्त केला आहे. तसेच पूलाबाबत लगेच काही निष्कर्ष बांधणे योग्य ठरणार नाही, असेही म्हणणे आहे.

पुलामुळे वाहतूक कोंडी नाहीशी होते ही संकल्पना आत बाद केली पाहिजे. परदेशात अनेक ठिकाणी पूल पाडायला सुरवात केली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली हवी. त्यासाठी प्रयत्न करावेत. मात्र आता खासगी वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहतुकीच्या १० पट खर्च केला जात आहे. महापालिका केवळ खासगी वाहनांची सोय पाहत आहे. पुलासाठी लाखो रुपये देणार मात्र पीएमपीसाठी पैसे देण्याची वेळ येते तेव्हा बजेटचा विचार केला जातो. कमी अंतरासाठी सायकल वापरायला प्राधान्य द्यायला पाहिजे.

सुजित पटवर्धन, संस्थापक व विश्वस्त, परिसर

पूल बांधल्यानंतर शिल्लक रस्त्यावर वाहतुकीचा काय परिणाम होर्इल याचा विचार करायला हवा होता. मात्र तो करण्यात आला नाही हे आता स्पष्ट झाले आहे. मेट्रो आहे तर पूल कशाला? असा अगदी साधा प्रश्‍न यामुळे उपस्थित होतो. हे सर्व टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम हवी. कारण वाहतूक वळवून काहीच साध्य होत नाही. कोंडी या चौकातून त्या चौकात जाते. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली, परवडणारी किंवा मोफत झाली तर कोंडी आपोआप कमी होर्इल. नळ स्टॉप चौकातील पुलामुळे पादचाऱ्यांची देखील मोठी गैरसोय झाली आहे.

प्रांजली देशपांडे- आगाशे, सार्वजनिक वाहतूक तज्ज्ञ

मुळात हा पूल मेट्रोच्या खाली बांधला ही पहिली चूक आहे. पुण्याच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात आपण नमूद केले आहे की सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यायचे. मात्र असे पूल बांधून आपण सार्वजनिक वाहतुकीला आणखी कमकुवत करीत आहोत. हीच चूक आणखी काही ठिकाणी आपण करणार आहोत. त्याचा परिमाण मेट्रोवर होर्इल. या सर्व प्रकारांमुळे महानगर पालिकेची वाहतूक सुरक्षित करण्याची क्षमता कितपत सक्षम आहे हे तपासणे गरजेचे आहे. खासगी वाहनांचे लाड पुरवून सार्वजनिक वाहतुकीच्या पायावर धोंडा मारण्याचे काम किती दिवस सुरू ठेवणार याचा विचार करायला हवा.

हर्षद अभ्यंकर, संचालक सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट

सध्या कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे देखील कोंडी होत असेल किंवा कोंडीमागे दुसरेही काही कारण असू शकते. हा पूल सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. त्यामुळे तो कोंडी फोडण्यासाठी यशस्वी ठरला की नाही हे ठरविण्यासाठी काही दिवस वाट पाहायला हवी. मात्र उड्डाणपूल जेथे संपतो तेथे कोंडी होत आहे. अशीच स्थिती इतर काही ठिकाणी आहे. या भागात कॅनॉल रस्ता आणि लॉ कॉलेज रस्त्यावर मोठी कोंडी होत आहे. त्याचा विचार व्हायला हवा.

प्रा. अनिता गोखले बेनिनजर, शाश्वत विकास योजना

Web Title: Pune Bridges Public Transport System Will Break

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top