

पुणे, ता. ३१ ः शहराच्या वेगवेगळ्या भागांत घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज लांबविला. आंबेगाव आणि लोहगाव परिसरात या घटना घडल्या. दरम्यान, हडपसरमधील सोसायटीच्या आवारातील मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी दानपेटी फोडून २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
आंबेगावातील टेल्को कॉलनी परिसरातील त्रिमूर्ती प्रेस्टीज सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा चार लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एका तरुणाने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून रोकड, दागिने चोरून नेले. शुक्रवारी (ता. ३०) कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
लोहगावमध्ये सव्वादोन लाख लंपास
लोहगावमधील संतनगर परिसरातील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ४२ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत सदनिकाधारकाने लोहगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
मंदिरातील दानपेटी फोडून चोरी
हडपसरमधील कुबेरा विहार सोसायटीच्या आवारातील गणेश मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी दानपेटीचे कुलूप तोडून २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी सोसायटीच्या आवारातील भिंतीवरून उडी मारून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रोकड घेऊन ते पसार झाले. याबाबत सोसायटीतील रहिवाशाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस कर्मचारी एन. टी. किर्वे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.