

पुणे, ता. ७ : पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील अस्वच्छतेमुळे महापालिकेची प्रतिमा डागाळत असल्याने, आता या भागातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई महापालिका स्वतः करणार आहे. या कामासाठी महापालिकेवर वर्षाला सुमारे दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिली.
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राज्य व केंद्र सरकारची अनेक महत्त्वाची कार्यालये आणि विभागीय आयुक्तालय आहे. या भागात मंत्री, वरिष्ठ अधिकारी व देश-विदेशातील महत्त्वाच्या व्यक्तींची सतत वर्दळ असते. मात्र, लष्करी हद्दीतील रस्त्यांवर कचरा असल्याने नागरिक व लोकप्रतिनिधींकडून महापालिकेकडे नाराजी व्यक्त केली जात होती. हा भाग तांत्रिकदृष्ट्या लष्कराच्या ताब्यात असला तरी, शहराची प्रतिमा जपण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
कँटोन्मेंट बोर्डाकडे असलेल्या मनुष्यबळ आणि निधीच्या कमतरतेमुळे महापालिका व लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत रस्ते सफाईवर एकमत झाले. त्यानुसार, लवकरच महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत या परिसरातील प्रमुख मार्गांचे झाडणकाम आणि कचरा संकलन केले जाणार आहे.
‘‘पुणे कँटोन्मेंट हद्दीतील रस्त्यांची स्वच्छता करण्याचे काम महापालिका करणार असून, वर्षाला सुमारे दोन कोटींचा खर्च वाढणार आहे. पण, या भागात अनेक महत्त्वाची कार्यालये असल्याने तेथे महत्त्वाच्या व्यक्तींकडून या भागातील रस्त्यांचा वापर केला जात आहे. तिथल्या अस्वच्छतेमुळे तक्रारीदेखील येत आहेत. त्यामुळे महापालिकेकडूनच कँटोन्मेंट हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या सफाईचा निर्णय घेतला आहे.’’
- प्रजीत नायर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.