Pune Chandani Chowk Bridge Demolition : विस्फोटक भरण्याचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Chandani Chowk Bridge Demolition Explosive filling work started

Pune Chandani Chowk Bridge Demolition : विस्फोटक भरण्याचे काम सुरू

पुणे : चांदणी चौकातील जुन्या पुलाच्या छिद्रांमध्ये आजपासून विस्फोटक भरण्याचे काम सुरू झाले. हे काम दोन दिवस चालणार आहे. या दोन दिवसांत सुमारे १,३०० छिद्रांमध्ये ६०० किलो विस्फोटक भरले जाणार आहे. शिवाय हे करतानाच खालच्या बाजूस केवळ दगडच नाही, तर धूळदेखील उडू नये म्हणून विशिष्ट अशा जिओ पद्धतीचा वापर केला जात आहे, त्यामुळे कमीत कमी धूळ उडणार आहे. यासाठी पांढऱ्या रंगाच्या कापडाचा वापर केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूल पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. शेवटच्या टप्प्यात पुलावर ड्रिलिंग करून तयार केलेल्या छिद्रांमध्ये बुधवारी रात्रीपासून विस्फोटक भरण्याचे काम सुरू झाले. शुक्रवारी (ता. ३०) रात्रीपर्यंत हे काम चालणार आहे. त्यानंतर रविवारी (ता. २) पहाटे दोन वाजता पूल सेंट्रल ब्लास्टिंग पद्धतीने पाडला जाणार आहे.

काय आहे जिओ पद्धत

स्फोट झाल्यानंतर त्यातील दगड व इतर राडारोडा जास्त प्रमाणात परिसरात पसरू नये, यासाठी पुलाला सध्या लोखंडी जाळी लावण्यात येत आहे. तसेच स्फोटानंतर उडणारी धूळ लक्षात घेता पुलाला कापडाचे आवरण तयार करण्यात आले, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘इमल्शन’चा वापर

चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी ‘इमल्शन’ नावाच्या विस्फोटकाचा वापर होणार आहे. यात ‘नायट्रेट’चादेखील समावेश असेल. अवघ्या ५ सेकंदांत हा पूल जमीनदोस्त होईल. यासाठी किमान दीड कोटीचा खर्च होणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले...

  • स्फोट करण्यापूर्वी दोनशे मीटर परिघातील परिसर शनिवारी रात्री अकरानंतर पूर्णत: निर्मनुष्य करणार

  • या परिघात तीन हॉटेल असून, त्याव्यतिरिक्त सोसायटीचा परिसर नाही.

  • रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘एनएचएआय’ आणि पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.

  • पर्यायी मार्ग आणि वाहतुकीचे नियमन करण्याबाबत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांना सूचना

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने म्हणाले...

  • या परिघातील हॉटेलचालकांना हिंजवडी पोलिसांमार्फत नोटिसा

  • स्फोटाच्या वेळी दोनशे मीटर परिसरात एडीफिस कंपनीचे केवळ चार कर्मचारी असतील.

  • त्याव्यतिरिक्त एनएचएआय, पोलिस किंवा इतर कोणालाही प्रवेश नसेल.

  • पुलाचा राडारोडा काढल्यानंतर वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यात येणार आहे.

आमच्या भागात जे ध्वनिप्रदूषण होत आहे, त्यासाठी कोणते रोधक आहेत. जसे गतिरोधक असतात तसे ध्वनिरोधक हवे आहेत. रोज सुरू असलेल्या कर्णकर्कश आवाजामुळे आम्ही त्रासलो आहोत.

- सागर मसूरकर, रहिवासी

माझं हॉटेल या पुलाला लागून आहे. परंतु अद्याप आम्हाला व माझ्याशेजारी असलेल्या इमारतींमध्येदेखील कुठलीही सूचना लेखी वा तोंडी स्वरूपात प्राप्त झालेली नाही.

- बाबा शिंदे, विवा इन हॉटेलचे मालक

‘चादंणी चौक पाण्याच्या टाकीपलीकडे असणाऱ्या भागात लोकवस्ती आहे. प्रामुख्याने कामगारांची संख्या जास्त आहे. रात्री-अपरात्री येणाऱ्या लोकांनी घरी कसे यायचे?

- मानवेंद्र वर्तक