Pune : चांदणीचौक पुल पाडणार असल्या बाबत नागरिकांमध्ये संभ्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : चांदणीचौक पुल पाडणार असल्या बाबत नागरिकांमध्ये संभ्रम

कोथरुड : चांदणी चौकातील उड्डाण पुल पाडण्याची सर्व तयारी प्रशासनाकडून पुर्ण झाली आहे. शनिवारी रात्री ११ पासून रस्ता बंद करणार आहेत. व मध्यरात्री पुल पाडणार असल्याच्या बातम्या आम्हाला वर्तमानपत्रातून, समाज माध्यमातून समजल्या परंतु प्रत्यक्षात, लेखी अशी कोणतीही सुचना, माहिती आम्हाला मिळाली नाही असे चांदणीचौक परिसरातील रहीवाशांनी सांगितले. त्यामुळे उड्डाण पुल पडणार की नाही याबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्याचे चित्र आहे.

झिनीया सोसायटीतील रहीवाशी सागर मसुरकर म्हणाले की, आमच्या भागात जे ध्वनी प्रदुषण होत आहे त्यासाठी कोणते रोधक आहेत. जसे गतीरोधक असतात तसे ध्वनी रोधक हवे आहेत. रोज सुरु असलेल्या कर्णकर्कश आवाजामुळे आम्ही त्रासलो आहोत. पुल पाडल्यानंतर किमान पाच महिने आम्हाला वाहतुक कोंडीचा त्रास भोगावा लागू शकतो.

चांदणीचौकाच्या पुलालगत असलेल्या विवा इन हॉटेलचे मालक बाबा शिंदे म्हणाले की, माझं हॉटेल सदर पुलाला लागून आहे. परंतु अद्याप आम्हाला व माझ्या शेजारी असल्यास सर्व इमारतींमध्ये देखील कुठलीही सूचना लेखी वा तोंडी स्वरुपात प्राप्त झालेली नाही. माझ्या हॉटेलच्या सर्व बाजूला काचेच्या मोठ्या खिडक्या आहेत. याबाबत प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे. निर्माण होणाऱ्या धुळीमुळे जे प्रदूषण होणार आहे. त्याला कसा प्रतिबंध करणार, त्याचे निर्मूलन कसे करणार याबद्दल उत्सुकता आहे. खरे पाहिले तर स्थानिक नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत प्रशासनाने मीटिंग घेऊन सर्व सोसायटी चेअरमन यांना अवगत करायला हवे.

वेदाचार्य घैसास गुरुजी पाठशाळेचे मोरेश्वर घैसास गुरुजी म्हणाले की, आंम्हाला कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी सूचना नाही.मेघमल्हार सोसायटीमधील संदीप मेस्री म्हणाले की, स्थानिकांना या विषयावर कोणतीही कल्पना दिलेली नाही. या पुलाच्या कामामुळे होणा-या अनेक बाबींचा त्रास येथील रहीवाशांना भोगावा लागत आहे. मानवेंद्र वर्तक म्हणाले की, चादंणीचौक पाण्याच्या टाकी पलिकडे असणा-या भागात लोकवस्ती आहे. प्रामुख्याने कामगारांची संख्या जास्त आहे. रात्री अपरात्री येणा-या लोकांनी घरी कसे यायचे याबद्दल काय पर्याय दिले आहेत हे कोणालाच माहित नाही.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे म्हणाले की, आमच्याशी या विषयावर कोणीही संपर्क साधलेला नाही. हे काम महामार्गाचे असल्याने ते योग्य ती खबरदारी घेतील. महानगर नियोजनकार विवेक खरवडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.

माहिती बाबत फक्त प्रसार माध्यमावर विसंबून राहणे योग्य नाही. स्थानिकांना प्रत्यक्ष भेटून कळवायला हवे. परिसरातील रहीवाशांची सभा घेवून त्यांना माहिती देणे स्फोटके वापरुन पुल पाडणार त्यावेळी काय घडू शकते, प्रतिबंधात्मक गोष्टीची माहिती द्यावी. काचेच्या खिडक्या फुटल्यास वा काही आपत्ती झाल्यास कोण जबाबदार हे स्पष्ट नाही. पादचा-यांच्या सुरक्षेचा विचार नाही. झिनीया, कुणाल बेलेन्झा या सोसायटीला साऊंड बँरीयर आणि सुरक्षा भिंतीची गरज आहे.