छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

‘छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणायला कोणाची ना नाही, ते स्वराज्य रक्षक आहेतच. पण ते धर्मवीर नाहीत, असे म्हणणे हा एकप्रकारे त्यांच्या विचारांशी द्रोह आहे आणि संभाजी महाराजांवर अन्यायच आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह

पुणे - ‘छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणायला कोणाची ना नाही, ते स्वराज्य रक्षक आहेतच. पण ते धर्मवीर नाहीत, असे म्हणणे हा एकप्रकारे त्यांच्या विचारांशी द्रोह आहे आणि संभाजी महाराजांवर अन्यायच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते, तर महाराष्ट्रात हिंदूच उरले नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच. ते धर्मवीर नाही, हे म्हणणे द्रोह आहे,’ अशी स्पष्टोक्ती करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणाऱ्यांवर टीका केली.

पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ‘छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर’ हा वाद आता रस्त्यावर आल्याबाबत विचारले असता फडणवीस यांनी आपले म्हणणे मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांनी ‘‘आम्ही शरद पवार यांना जाणता राजा म्हणणार’, असे वक्तव्य केले. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘या देशामध्ये एकच जाणते राजे आहेत आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी कोणाला आपल्या नेत्यांना काय म्हणायचे असेल, ते त्यांनी म्हणावे. पण जनता ते म्हणणार नाही.’

‘मुंबईतील विशेष पोलिस आयुक्त (स्पेशल सीपी) हे पद असले तरीही ते मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या अधिनस्त पद आहे. ‘स्पेशल सीपी’यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना रिपोर्ट करायचे आहे, असा खुलासाही फडणवीस यांनी यावेळी केला.

सुप्रियाताईंचे म्हणणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ऐकावे

खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका करताना पातळी सोडू नये’, असे आवाहन केले, त्यावर फडणवीस म्हणाले, ‘सुप्रियाताईंनी जे आवाहन केले, त्याचे स्वागत आहे. फक्त त्यांनी केलेले आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ऐकले पाहिजे. कारण सातत्याने अशा पद्धतीने खालच्या दर्जाची टीका ही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते सोशल मिडियावर करत असतात. त्यामुळे सुप्रियाताईंचे पूर्ण समर्थन करून आम्ही देखील तेच आव्हान करू. परंतु सुप्रियाताईंच्या कार्यकर्त्यांनी एकदा तरी त्यांचे ऐकावे.’

महाराष्ट्रातील उद्योग कोणीच पळवू शकणार नाही

‘देशात कोणालाही उद्योग आपल्याकडे आकृष्ट करायचे असतील, किंवा औद्योगिक समेट करायची असेल, तर त्यांना मुंबईत आल्याशिवाय पर्याय नाही, ही आपली ताकद आहे. महाराष्ट्रातील उद्योग कोणीच पळवून नेऊ शकत नाही. प्रत्येक राज्याची आपली एक भौगोलिक, नैसर्गिक ताकद असते, त्यामुळे ते-ते उद्योग तेथे जातात. उदाहरणार्थ गुजरात, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात वाळवंट आहे, त्यामुळे तिथे जमिनीची उपलब्धता आहे. तीन ते चार लाख एकर जमीन सोलर पॅनल करता उपलब्ध होते. त्यामुळे ग्रीन हायड्रोजनसारखे प्रकल्प तेथे जातात. तेवढी जमीन आपल्याकडे उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून बिलकूल घाबरण्याचे कारण नाही. कोणी कितीही बोलले तरीही, शेवटी भारताची आर्थिक राजधानी ही मुंबईच आहे.’

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री