पुणेकरांनी काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन; रोजच्या तपासणीत 28 टक्के कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

खासगी आणि महापालिका रुग्णालयांत बेड मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पुणेकरांना पावलागणिक काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच, मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियमही काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत.

पुणे - शहरामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण रोजच्या तपासणीच्या तुलनेमध्ये २८ टक्‍क्‍यांपर्यंत गेल्याचे गुरुवारी दिसून आले. हा आकडा कमी न झाल्यास चार-आठ दिवसांत स्थिती आणखी खराब होण्याची भीती महापालिकेने आकड्यानिशी मांडली आहे. दुसरीकडे, खासगी आणि महापालिका रुग्णालयांत बेड मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पुणेकरांना पावलागणिक काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच, मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियमही काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत.

शहरात मार्चपासून वाढलेला कोरोनाचा संसर्ग जुलैमध्ये काही प्रमाणात कमी झाल्याचे दररोजच्या नवीन रुग्णसंख्येवरून दिसत होते. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यापर्यंत रोज सरासरी १२०० ते १३०० रुग्ण सापडत होते. मात्र, गणेशोत्सव आणि त्याआधी ‘सोशल डिस्टन्सिंग’कडे काणाडोळा झाल्याने रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्‍यता खरी ठरली आणि उत्सवानंतरच्या काही दिवसांतच रुग्णांचा दररोजचा आकडा दोन हजारांच्या आसपास जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या दररोज सरासरी सव्वासहा ते साडेसहा हजार नागरिकांच्या तपासण्या होत आहेत. त्यातुलनेत नव्या रुग्णांचे प्रमाण गुरुवारी २७ ते २८ टक्‍क्‍यांपर्यंत गेल्याने प्रशासकीय यंत्रणाही आवाक झाली. हे प्रमाण आठ दिवसांपूर्वी २४ टक्के इतके होते. 

सप्टेंबरमध्ये कोरोनाची साथ आटोक्‍यात येण्याचे अंदाजे असतानाही; ती वाढत असल्याने शहरातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याची कबुली महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी दिली. ही चिंता व्यक्त करतानाच संसर्ग कमी न झाल्यास नवीन आव्हाने उभी राहतील, अशी भीतीही त्यांच्या बोलण्यातून जाणवली.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बेडसाठी पुन्हा पाहणी 
पुणे शहरातील खासगी हॉस्पिटलमधील ७० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. परंतु, नवीन रुग्णसंख्या लक्षात घेता, काही हॉस्पिटलमध्ये महापालिका बेडसाठी चाचपणी करत आहे. त्यासाठी अधिक क्षमतेच्या हॉस्पिटलची पाहणी करण्यात येत असून, शक्‍य तेवढ्या ‘आयसीयू’ आणि ‘ऑक्‍सिजन’ बेड ताब्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गणेशोत्सवातील गर्दीमुळे कोरोनाची साथ वाढल्याचे बोलले जात असले, तरी नेमकी कारणे हाती नाहीत. त्यातही अत्यवस्थ रुग्णांची संख्याही कमी होईनाशी झाली आहे. त्यामुळे आयसीयूआणि ऑक्‍सिजन बेडची गरज भासत आहे. रुग्णांना वेळेत उपचारासाठी बेड पुरविण्याचा प्रयत्न आहे. 
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune citizen Use a mask keep a distance Pune Municipal corporation appeal