Monsoon : पुणेकरांना पावसाच्या जोरदार सरींची प्रतिक्षा

राज्यात आगमन झालेला मॉन्सून पुण्यात अद्याप आलेला नाही. जून महिन्यात पुणे जिल्ह्यात केवळ आतापर्यंत २०.७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद.
Rain
Rainesakal

पुणे - जून महिन्याचा तिसरा आठवडाही उलटून गेला तरी पुण्यात पावसाच्या जोरदार सरींची प्रतिक्षा कायम आहे. राज्यात आगमन झालेला मॉन्सून पुण्यात अद्याप आलेला नाही. जून महिन्यात पुणे जिल्ह्यात केवळ आतापर्यंत २०.७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. हे प्रमाण सरासरीपेक्षा तब्बल ८१ टक्के कमी आहे. हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही वर्षांत २०१४ आणि २०२२ या दोन वर्षी संपूर्ण जून महिन्यात ५० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मॉन्सूनने राज्यात ११ जून रोजी तळ कोकणासह दक्षिणेकडील काही भागांत प्रवेश केला. मात्र त्यानंतर मॉन्सूनचा प्रवास अडखळत सुरू असून पूर्वमोसमी पावसानेही राज्यातून दडी मारली होती.

एक ते २२ जून दरम्यान पावसाची पुण्यात गेल्या तीन वर्षांतील स्थिती पाहता यंदाचे प्रमाण नीचांकी ठरले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत २९.३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत २०.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यातही काहीशी अशीच स्थिती असून या कालावधीत साधारणपणे ११२.६ मिलिमीटर पाऊस पडतो. जूनचा अद्याप एक आठवडा बाकी असून हवामानशास्त्र विभागाने शहर व परिसरात पावसाच्या आगमनाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे पावसाची कसर आता भरून निघेल अशी आशा आहे.

सध्या पावसाअभावी कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा मे महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यात मॉन्सूनअभावी बळीराजासमोर पेरणीचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. बहुतांश भागांत पेरणीपूर्व कामेही रखडलेली असून हवामानाची स्थिती अशीच राहीली तर खरीप हंगाम अडचणीचा असेल अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

दरम्यान, जून महिन्यात यंदा राज्यात ही सरासरीपेक्षा ८८ टक्के कमी पाऊस झाला आहे. साधारणपणे एक ते २२ जूनपर्यंत राज्यात १३३.९ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. परंतु या वर्षी जूनमध्ये आतापर्यंत राज्यात फक्त १५.६ मिमी पाऊस पडला, म्हणजेच उणे ८८ टक्के पाऊस पडला. त्यात सर्वात कमी पाऊस विदर्भात झाल्याचे स्पष्‍ट होत आहे.

तर काही जिल्ह्यांमध्ये अक्षरश- पाऊस नसल्‍यासारखी स्थिती आहे. एकीकडे संपूर्ण राज्यात मॉन्सूनच्या आगमनाची आस लागली असता प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती निर्माण झाली आहे. ‘एल निनो’ सक्रिय असलेल्या वर्षांमधील मॉन्सून हंगामातील स्थिती पाहता त्यातील बहुतेक वर्षांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा ही ‘एल निनो’चा प्रभाव मॉन्सून हंगामावर होईल का अशी चिंता आहे.

Rain
Baramati Politics : बारामतीतील राजकीय वातावरण तापणार

मागील तीन वर्षांत पुणे शहरातील पाऊस (१ ते २२ जूनपर्यंत)

वर्ष - पाऊस (मिलिमीटरमध्ये)

२०२१ - १२९

२०२२ - २९.३४

२०२३ - २०.७

ठळक बाबी -

- या पूर्वी २०१९ मध्ये ही जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद

- मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर होता कमी

- यंदा १ ते २२ जून या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा ८८ टक्के कमी पाऊस

- विदर्भात सरासरीपेक्षा ९१ टक्के कमी पाऊस

- सोलापूर, जालना, हिंगोली, उस्‍मानाबाद जिल्ह्यांमध्ये तर पाऊस नसल्याची स्थिती

Rain
Pune Crime : महिलेचे शोषण आणि सैन्यात भरतीचे आमिष; तोतया लष्करी अधिकाऱ्याला अटक

जूनमधील पावसाची विभागनिहाय स्थिती (पाऊस मिलिमीटरमध्ये) -

विभाग - सरासरी पडणारा पाऊस - प्रत्‍यक्षात पडलेला पाऊस - झालेली तफावत (टक्केवारीत)

कोकण - ४४५.१ - ६७.८ - उणे ८५

मध्य महाराष्ट्र - १०३.३ - १४ - उणे ८६

मराठवाडा - ९४.४ - ९.४ - उणे ९०

विदर्भ - १०६.३ - ९.८ - उणे ९१

निचांक-उच्चांक

  • पुण्यात यापूर्वी सर्वाधिक कोरड्या जून महिन्याची नोंद ही १९४७ मध्ये झाली. तेव्हा केवळ १.३ मिलिमीटर इतका पाऊस पडला होता.

  • १९९१ मधील जून महिना सर्वाधिक ओला ठरला. त्यावेळी ५२९.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com