पुणे शहरात १६ महिन्यांत १,७६८ मोटारसायकली चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vehicle Theft
पुणे शहरात १६ महिन्यांत १,७६८ मोटारसायकली चोरीला

पुणे शहरात १६ महिन्यांत १,७६८ मोटारसायकली चोरीला

पुणे - शहरात (Pune City) सध्या कष्टकऱ्यांची वाहने चोरीला (Vehicle Theft) जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या १६ महिन्यांत सुमारे दीड हजारांहून अधिक वाहने चोरीला गेली आहेत. तसेच, आतापर्यंत ४२ बुलेट व गतवर्षी ३३ महागड्या सायकल चोरीला गेल्या आहेत. दुचाकीस्वारांप्रमाणे सायकलप्रेमींनाही चोरीचा फटका बसत आहे.

सार्वजनिक ठिकाणी किंवा निवासी ठिकाणांहून वाहने चोरीला जाण्याच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या १६ महिन्यांत शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकींची संख्या एक हजार ७६८ इतकी आहे. याचा सर्वसामान्य नागरिक व कष्टकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मात्र, वाहनचोरीच्या तपासाबाबत पोलिसांमध्ये कमालीची उदासीनता आहे. फिर्याद देऊन कित्येक दिवस उलटल्यानंतरही वाहनाचा तपास लागत नाही. घरफोडी किंवा अन्य गुन्ह्यातील आरोपीच वाहनचोर निघतात. विशेष म्हणजे सध्या गुन्हे शाखेलाच वाहनचोरीच्या तपासात रस नसल्याची सद्यःस्थिती आहे.

चोरलेल्या वाहनांची विक्री

चोरट्यांकडून महागड्या दुचाकी व सायकल चोरण्याकडे कल आहे. बुलेट, होंडा, यामाहा अशा दुचाकींसह सोसायट्यांच्या पार्किंगमधून महागड्या सायकली चोरण्यावर चोरट्यांचा भर आहे. चोरलेल्या सायकलींची चोरांकडून विक्री केली जात आहे. स्वारगेट पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये चोरट्यांकडून तब्बल सात लाख रुपये किमतीच्या ३३ महागड्या सायकली व बुलेट जप्त करून चोरट्यांना अटक केली होती.

वाहनचोरी टाळण्यासाठी हे करा

  • वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत

  • वाहन खरेदी करतानाच हॅंडललॉकच्या दर्जाची तपासणी करा

  • पेट्रोल लॉक, यूलॉक वापरण्यास प्राधान्य द्या

  • दुचाकींनाही ‘जीपीएस’, अलार्म यंत्रणा बसविण्यास प्राधान्य द्या

  • वायर लॉक, लोखंडी साखळी कुलूप लावल्यासही चोरीचा धोका टळेल

माझी दुचाकी चोरीला जाऊन दोन वर्षे उलटली. परंतु, अजूनही पोलिसांकडून कुठलीच माहिती मिळत नाही. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याची विनंती केली, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आता जुनी दुचाकी विकत घेऊन काम करीत आहे.

- अनिकेत पाटील, नागरिक

वाहनचोरी पथकाला नवीन अधिकारी दिले आहेत. त्याचबरोबर गुन्हे शाखेकडून वाहनचोरीच्या घटनांचे विश्‍लेषण केले जात आहे. त्यातून जुन्या, भंगार गाड्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहारही तपासले जात आहेत. वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांची सातत्याने तपासणी केली जात आहे, तसेच नाकेबंदी करून वाहनचोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे)

Web Title: Pune City 1768 Motorcycle Theft In Sixteen Months

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top