BRT Route : पुणे शहरात बीआरटी मार्गावर खासगी वाहने सुसाट; प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

पुणे शहरात कोणी पदपथावरून वाहन चालवत आहेत... कोणी सायकल ट्रॅकवरून... तर शेकडो खासगी वाहने बीआरटी मार्गावरून भरधाव जात असल्याचे चित्र दररोज दिसून येत आहे.
Private Vehicle in BRT Route
Private Vehicle in BRT Routesakal

पुणे - शहरात कोणी पदपथावरून वाहन चालवत आहेत...कोणी सायकल ट्रॅकवरून... तर शेकडो खासगी वाहने बीआरटी मार्गावरून भरधाव जात असल्याचे चित्र दररोज दिसून येत आहे. बीआरटी मार्गात खासगी वाहनांच्या घुसखोरीमुळे अपघात वाढत आहेत. पण ही घुसखोरी रोखायची कोणी, यावरून महापालिका, वाहतूक पोलिस आणि पीएमपी प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे.

बीआरटी मार्गांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. नगर रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी बीआरटी मार्गात दुभाजकाला धडकून तेलाचा टॅंकर पलटी झाला. तो टॅंकर तसाच अडकून पडल्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी झाली. दिघी-आळंदी बीआरटी मार्गावर मोटारीने बसथांबाच उडविल्याची घटना नुकतीच घडली. त्यावेळी बसथांब्यावर कोणी नव्हते, त्यामुळे जीवित हानी टळली. बीआरटी मार्गात खासगी वाहने वाढली आहेत.

पण त्यांच्यावर कारवाई कोणी करायची, या वादात खासगी वाहनचालक बीआरटी मार्गावर सुसाट सुटले आहेत. बीआरटी मार्गावरील वाहतूक सुरक्षित होण्यासाठी महापालिका, पीएमपीएमएल आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रित बसून मार्ग काढण्याची गरज आहे.

कारवाईचे अधिकार कोणाला?

महापालिका आणि वाहतूक पोलिसांना कारवाईचे अधिकार आहेत. परंतु वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगितले जात आहे. तर, महापालिकेकडून शहरात ६५० वॉर्डन नेमण्यात येणार आहेत. परंतु सध्या बीआरटी मार्गावर वॉर्डन नाहीत. त्यामुळे खासगी वाहनचालकांना कोण आवर घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पीएमपीएमएलला बीआरटी मार्गात घुसणाऱ्या खासगी वाहनचालकांवर कारवाईचे अधिकार नाहीत. खासगी वाहनचालकांवर कारवाई करण्याबाबत वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा आवश्यक असून, बीआरटी बसचा वेग, देखभाल, खर्चाची बचत अशा बाबी विचारात घेता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात बीआरटीचे जाळे सक्षम करणे गरजेचे आहे.

- अनंत वाघमारे, प्रमुख बीआरटी.

Private Vehicle in BRT Route
Pune News : पुण्यातही झोपडीधारकांना मिळणार अडीच लाखात घर; राज्य सरकारचा निर्णय

नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शहराचा वाढलेला विस्तार आणि वाहनांच्या संख्येच्या तुलनेत वाहतूक शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे बीआरटी मार्गासाठी वाहतूक पोलिस देणे शक्य होत नाही. महापालिकेने वॉर्डन उपलब्ध करून दिल्यास त्यांना वाहतूक पोलिस मदत करतील.

- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बीआरटी कॉरिडॉर -

  • नाशिक फाटा ते वाकड

  • निगडी ते दापोडी

  • संगमवाडी ते विश्रांतवाडी

  • सांगवी फाटा ते किवळे

  • येरवडा ते वाघोली

  • काळेवाडी फाटा ते चिखली

  • स्वारगेट ते कात्रज

  • दिघी ते आळंदी

Private Vehicle in BRT Route
Organ Donation : पुण्यात दहा पटीने वाढले अवयवदान!

दृष्टिक्षेपात बीआरटी -

  • एकूण कॉरिडॉर - ८

  • अंतर - ६९.५ किलोमीटर

  • बसथांबे - १२४

  • बसेस फेऱ्या - ९११०

  • प्रतिदिन प्रवासी संख्या - ५ लाख ११ हजार ७४९

  • प्रतिदिन उत्पन्न - ८३ लाख १० हजार ९५५ रुपये

पुणे शहर बीआरटी मार्गावर अपघात (१ जानेवारी ते ३१ मे २०२३)

  • एकूण अपघात ८

  • मृत्यू - ३

  • जखमी - ६

पिंपरीत २९ हजार ५७८ वाहनचालकांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत बीआरटी मार्गामध्ये अनधिकृत प्रवेश करणाऱ्या खासगी वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून मागील ऑक्टोबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत २९ हजार ५७८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १८ लाख ८३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com