Pune Flood: पुणे शहराला पुराचा धोका! मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा; पालिकेचे दुर्लक्ष

भिडे पूल ते संगम पूल या दरम्यानच्या सुमारे तीन किलोमीटरच्या अंतरातील नदीपात्राची पाहणी ‘सकाळ’च्या टीमने गुरुवारी केली.
Shivaji Bridge Garbage
Shivaji Bridge GarbageSakal

- उमेश शेळके/ योगिराज प्रभुणे

पुणे - नदीपात्रात राडारोडा टाकण्याचा प्रकार पंधरा दिवसांपूर्वी ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता. त्यानंतर अशा प्रकारांना चाप बसेल, पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत, यांची महापालिका काळजी घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

प्रत्यक्षात मात्र भिडे पूल ते संगम पूल या दरम्यानच्या सुमारे तीन किलोमीटरच्या अंतरातील नदीपात्राची पाहणी ‘सकाळ’च्या टीमने गुरुवारी केली. या तीन किलोमीटरच्या अंतरावर चार ठिकाणी नदीपात्रात बांधकामाचा राडारोडा टाकून नदीचे विद्रूपीकरण सुरू असल्याचे दिसले, तसेच वाटेल तेथे कचरा टाकून नदीपात्राची कचरापेटी तयार करण्याचे भीषण चित्र पाहावयास मिळाले. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे.

येत्या काही दिवसांत वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. अशा काळातही नदीपात्रात राडारोडा टाकण्याचे प्रकार शहरात सुरूच असल्यामुळे पुराचा धोका सातत्याने वाढत आहे.

महापालिकेकडून एकीकडे नदीसुधार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या नदीला गतवैभव मिळून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असताना दुसरीकडे मात्र सर्रासपणे नदीपात्राचा वापर राडारोडा डंपिंगसाठी सुरूच आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

अशी आहे स्थिती...

  • भिडे पुलाजवळ ज्या ठिकाणी राडारोडा टाकल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याच ठिकाणी प्रथम भेट दिल्यानंतर तेथील राडारोडा उचलण्यात आला आहे.

  • मात्र त्याच जागेपासून काही अंतरावर थेट पात्रात नव्याने राडारोडा टाकण्यात आला आहे.

  • तेथून पुढे छोटा शेखसल्ला दर्गाच्या खालील बाजूस नदीपात्रात नुकताच राडारोडाच्या ट्रक रिकामा करण्यात आला आहे.

  • शनिवार पेठेकडून जयंतराव टिळक पुलावर जात असताना उजव्या बाजूला चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जाते. त्या ठिकाणी हा राडारोडा टाकण्यात आला आहे.

  • वास्तविक नदीपात्राच्या दुसऱ्या बाजूला महापालिकेचे मुख्य कार्यालय आहे. त्याची कोणतीही तमा न बाळगता हा राडारोडा पात्रात टाकण्यात आला आहे.

  • डेंगळे पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्या पुलाच्या खालील बाजूस कचरा डेपो तयार झाला आहे.

  • नदीपात्राचा वापर कचरा डंपिंगसाठी केला जात आहे का, अशी शंका यावी, अशा प्रकारे कचऱ्याचे ढीग आहेत.

  • संगमवाडी येथील बसस्थानकाच्या समोरील बाजूस नदीपात्रात चार ते पाच गाड्या राडारोडा टाकण्यात आला आहे.

  • नदीपात्रात कचरा टाकण्यास बंदी असल्याचे फलक आहेत. कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून हा राडारोडा टाकण्यात आला असल्याचे वास्तव आहे.

का केली पाहणी?

पंधरा दिवसांपूर्वी एका खासदाराशी संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून भरदिवसा नदीपात्रात राडारोडा टाकला जात असल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता. भिडे पुलाजवळ हा प्रकार घडला होता. त्यानंतर ‘सकाळ’ने पुन्हा नदीपात्रची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दुपारी प्रत्यक्ष नदीपात्रात जाऊन पाहणी केल्यानंतर भयंकर चित्र समोर आले.

नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा होईल अशा पद्धतीने राडारोडा टाकण्यावर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. यापूर्वी अशी करवाई करण्यात आली आहे, तसेच ज्या ठिकाणी राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यांची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

- बिपिन शिंदे, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com