I DON'T LOVE पैशांची उधळपट्टी

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फॅड आहे. पादचारी मार्गावर वाचनालये सुरू करणे, रस्त्याच्या कडेने, पुलावर सूर्यनमस्कार, योगासनांच्या कृतीचे बोर्ड लावणे असे प्रकार होतात.
Selfie Point
Selfie PointSakal
Summary

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फॅड आहे. पादचारी मार्गावर वाचनालये सुरू करणे, रस्त्याच्या कडेने, पुलावर सूर्यनमस्कार, योगासनांच्या कृतीचे बोर्ड लावणे असे प्रकार होतात.

पुणे शहरात जिथे तिथे 'आय लव्ह...' लिहिलेल्या सेल्फी पॉइंट बोर्डांचे पेव फुटले आहे. प्रथमदर्शनी महापालिकेतील तत्कालीन नगरसेवकांनी त्यांना मिळणाऱ्या निधीची रक्कम या बोर्डांवर खर्च केल्याचे दिसते; प्रत्यक्षात महापालिकेतील कोणत्याच विभागाकडे या खर्चाची नेमकी नोंद नाही. करदात्यांचे कोट्यवधी रुपये 'आय लव्ह...' बोर्डांवर उधळल्याचे समोर आले आहे.

पुणे - महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फॅड आहे. पादचारी मार्गावर वाचनालये सुरू करणे, रस्त्याच्या कडेने, पुलावर सूर्यनमस्कार, योगासनांच्या कृतीचे बोर्ड लावणे असे प्रकार होतात. एका नगरसेवकाने त्याची सुरवात केली की हळूहळू त्याच कामांनी शहर व्यापून जाते. सुरवातीला आकर्षणाचे केंद्र ठरणारे हे काम नंतर मात्र, केवळ निधी खर्ची पाडण्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनाला हाती धरून केलेला उद्योग ठरते.

‘आय लव्ह’ आणि त्यात्या ठिकाणच्या परिसराचे नाव असा डिजिटल बोर्ड लावून सेल्फी पॉइंट तयार करणे अशी त्यामागची संकल्पना आहे. पण शहराचा विचार न करता आपापल्या प्रभागापुरते विचार करणाऱ्या नगरसेवकांनी त्यांच्या चमकोगिरीसाठी प्रेम दाखविण्यासाठी शहराची विभागणी केली. नगरसेवकांच्या ‘स’ यादीतून तीन लाखापासून ते १० लाखापर्यंत रक्कम ‘आय लव्ह’ बोर्डांवर खर्च करून टाकली आहे. स्वतःचे नावही डिजीटलमध्येच टाकले आहे. त्यामुळे आता नगरसेवकांची मुदत संपल्याने किंवा आचारसंहितेत ही नावे काढून टाकणेही प्रशासनाला अवघड जाणार आहे. शहरात आय लव्हचे बोर्ड जीपीओ, स्वारगेट, हडपसर, कोथरूड भेलके चौक, वारजे, औंध, येरवडा, वानवडी संविधान चौक, जांभूळकर चौक, आझादनगर, घोरपडी, बंडगार्डन, खराडी, कोंढवा, महंमदवाडी, बीटी कवडे रस्ता, मुंढवा, येरवडा, सारसबाग यासह इतर ठिकाणी लावण्यात आलेले आहेत.

धुळीने माखले प्रेम

चमकोगिरीसाठी आय लव्हचे बोर्ड लावण्याची संकल्पना नगरसेवक देतात. त्याचे धडाक्यात उद्‍घाटनही करतात. पण रस्त्यावरील वाहनांची संख्या, बाहेर पडणारा धूर व उडणारी धूळ यामुळे हे बोर्ड अतिशय घानेरड्या अवस्थेत असतात. नगरसेवकांच्या नावावरही धुळ बसलेली असते, पण या बोर्डची स्वच्छता करण्याकडेही दुर्लक्ष केले जाते. महापालिकेच्या पथदिव्यांसाठी केलेल्या वीज कनेक्शनमधून आय लव्हचे बोर्ड, रस्त्यात, चौकातील स्मारकांच्या रोषणाईला विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे. त्याबाबत विद्युत विभागाची परवानगी देखील घेण्यात आलेली नाही.

उडवाउडवीची उत्तरे

‘आय लव्ह’च्या बोर्डाची माहिती घेण्यासाठी काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे याचा तपशील उपलब्ध नाही. एका बोर्डासाठी किती खर्च आला हे देखील ते सांगू शकले नाहीत. माहिती बघावी लागेल, फाइल तपासावी लागेल, कनिष्ठ अभियंत्याला विचारावे लागेल अशी उत्तरे देण्यात आली.

खर्चाच्या नोंदीच नाहीत

गेल्या दोन-तीन वर्षांत महापालिकेने ऐतिहासिक प्रसंगांसह विविध प्रकारचे स्मारक चौकात, पादचारी मार्गावर उभारले आहेत, तसेच ‘आय लव्ह’चे बोर्डही लावले आहेत. त्यावरही कोट्यवधीचा खर्च झाला आहे. पण शहरात असे एकूण किती स्मारक आहेत, किती बोर्ड आहेत याची माहितीच क्षेत्रीय कार्यालये, अतिरिक्त आयुक्त कार्यालये, आयुक्त कार्यालयाकडे उपलब्ध नाही.

आय लव्ह पुणे यासारख्या बोर्डांना विद्युत विभागाची परवानगी नाही. या बोर्डांची उंची कमी असल्यामुळे अपघात होण्याची किंवा इजा होण्याची शक्यता असते. क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर विद्युतपुरवठा केला जात आहे. तो कसा करतात हे माहीत नाही. पण तक्रार आल्यानंतर त्यावर आम्ही कारवाई करतो.

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

तुम्ही I Love म्हणाल का?

सर्वसामान्य नागरिक म्हणून माननीयांच्या उधळपट्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं, ते आपल्या नावासह आम्हाला editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या क्रमांकावर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com