पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

पुणेकरांना सुरळीत आणि पुरेसे पाणी मिळण्याची आशा आहे. त्याचवेळी ज्या भागांतील पाणीपुरवठा विस्कळित होतो आहे, तो पूर्ववत करण्यात आल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पुणे - देखभाल दुरुस्तीकरिता शहरभराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या उपायावर लोकप्रतिनिधींनीच आक्षेप घेतल्याने आता कोणत्याही कारणांसाठी पुढची दोन महिने पाणी बंद न ठेवण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे पुणेकरांना सुरळीत आणि पुरेसे पाणी मिळण्याची आशा आहे. त्याचवेळी ज्या भागांतील पाणीपुरवठा विस्कळित होतो आहे, तो पूर्ववत करण्यात आल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत २४.५ अब्ज घनफूट ‘टीएमसी’ पाणीसाठा असल्याने पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हाच, सर्वत्र रोज एकवेळ तेही पुरेशा दाबाने पाणी देण्यात येत आहे. परंतु, देखभाल दुरुस्तीचे कारण देत दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्यात येते होते. दुरुस्तीच्या दुसऱ्या दिवशीही कमी दाबाने पाणी मिळाल्याने नागरिकांचे हाल झाले. त्यावरून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी बंद ठेवण्याची गरज नाही, तेव्हा पुणेकरांना रोज पाणी देण्याचा आदेश तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. त्यानुसार गुरुवारचा पाणीपुरवठा बंद करणार नसल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले होते. तरीही, गेल्या आठवड्यात गुरुवारी संपूर्ण शहरात पाणी सोडण्यात आले नव्हते. तसेच, त्याच्या आदल्या आणि दुसऱ्या दिवशीही काही भागांत वेळेत पाणी आले नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. त्यावरून अशाप्रकारे एकाच वेळी पाणीपुरवठा बंद करू नये, अशा सूचना आमदार व नगरसेवकांनी महापालिकेला केल्या. तर, काही राजकीय पक्षांनी आंदोलनही केले.

जलकेंद्र आणि वाहिन्यांची अत्यंत आवश्‍यक ती कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागतो. मात्र, पुढील महिना-दीड महिना कोणत्याही स्वरूपाची कामे नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत राहील.
- व्ही. जी. कुलकर्णी, विभागप्रमुख, पाणीपुरवठा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune city water supply will be continue