कौतुकास्पद! मध्यरात्रीच पुणे शहर होणार चकाचक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

गणेशोत्सवात शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असल्याने मध्यरात्रीच हा भाग स्वच्छ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी रोज एका अधिकाऱ्याला जबाबदारी दिली आहे.

पुणे : गणेशोत्सवात शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असल्याने मध्यरात्रीच हा भाग स्वच्छ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी रोज एका अधिकाऱ्याला जबाबदारी दिली आहे. 

शहराच्या मध्यवर्ती भागात गणपती व देखावे पहाण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. यावेळी खाद्यपदार्थाचे स्टॅल, खेळणी व इतर वस्तू विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा ठिकाणी मोठ्याप्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. रस्त्यावर पाण्याच्या बाटल्या, कॅरीबॅग, कागद, गर्दी तुटलेल्या चपला, बुटांचा खच पडलेला असतो. हे चित्र विशेषतः शुक्रवार पेठ, नारायण, सदाशिव, भवानी पेठ रविवार पेठ, कसबा पेठ येथे पहायला मिळते. तसेच मंडई परिसरात भाजी, फळे विक्रेते असतात त्याचा ही कचरा जमा झालेला असतो. 

गणेशोत्सवात शहर स्वच्छ रहावे यासाठी घनकचरा विभागाचे सुमारे 600 कर्मचारी, अधिकारी दोन पाळ्यांमध्ये काम करणार आहेत. सकाळी सहा ते दुपारी एक यावेळेत शहर स्वच्छ केले जाईल. रात्री 12 पर्यंत नागरिकांची देखावे पहाण्यासाठी गर्दी असते, त्यानंतर पहाटे चार पर्यंत काम करून मध्यवर्ती पेठा, नदीचे घाट यांची स्वच्छता करणार आहेत. या कामावर देखरेख करण्यासाठी रोज एक विभागप्रमुख असणार आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. 

महापौर, आयुक्तांकडून पहाणी 
स्वच्छता आढावा घेण्यासाठी महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत पेठा, नदी काठ येथे पहाणी केली. यावेळी मंडई परिसरात कचरा दिसल्याने त्यांनी त्वरीत स्वच्छता करण्यास सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune city will be shining at midnight