Pune: कोंबिग ऑपरेशन करून गुन्हेगारांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारवाई

पुणे : कोंबिग ऑपरेशन करून गुन्हेगारांवर कारवाई

पुणे : राज्यात घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी सोमवारी (ता. १५) कोंबिग ऑपरेशन केले. मध्यरात्री राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत तीन हजार ३०३ सराईत गुन्हेगारांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८१७ सराईत घरी वास्तव्यास असल्याचे आढळून आले.

कोंबिग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखा तसेच शहरातील सर्व पोलिस ठाण्यांची तपास पथके सहभागी झाली होती. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या ३२ जणांना या कारवाईत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २२ कोयते, सात तलवार, दोन पालघन आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली.

दरोडा, वाहन चोरी विरोधी पथकाने परदेशी सिगारेट बाळगल्याप्रकरणी एक खटला दाखल करून सात हजार ७०० रुपयांच्या सिगारेट जप्त केल्या. गा‌वठी दारू विक्री प्रकरणी कारवाई करून १२७ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. शहरातील हॉटेल तसेच लॉजची देखील तपासणी करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी ७२३ संशयित वाहनचालकांची तपासणी केली. कागदपत्रे न बाळगल्याप्रकरणी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, रामनाथ पोकळे, उपायुक्त प्रियांका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहिदास पवार, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

चोरी, खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक :

भारती विद्यापीठ परिसरात मोबाईल हिसकावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्यात गणेश अनिल भेगडे (वय २१, रा. गांजवे वाडा, नवी पेठ) याला अटक केली. खंडणी विरोधी पथकाने सिंहगड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात सागर हिरामण राजगुरू (वय ३०, रा. वडगाव बुद्रूक) याला अटक केली.

loading image
go to top