
पुणे महापालिकेने निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर होत असल्याचे शोधून काढण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केला.
पुणे - पुणे महापालिकेने निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर होत असल्याचे शोधून काढण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केला. त्यानंतर आता आखणी एक पाऊल पुढे टाकून महावितरणकडून व्यावसायिक मीटरची आणि अन्न व औषध प्रशासनाकडून परवान्यांची माहिती मिळवली आहे. त्यावरून जेथे व्यवसाय सुरू आहेत, अशा मिळकतींचा शोध घेतला जाणार आहे. त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
पुणे महापालिकेला उत्पन्न मिळवून देण्यामध्ये मिळकतकर विभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. गेल्यावर्षी पुणे महापालिकेने २१०० कोटी रुपयांचा उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे. महापालिकेचा प्रशासकीय खर्च, पगार, हद्दवाढ झाल्याने खर्चही मोठ्याप्रमाणात वाढला आहे. त्याच प्रमाणे जायका, नदी काठ सुधार प्रकल्प, विविध ठिकाणचे उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण, मलःवाहिनी यंत्रणा अशा कामांसाठीही दरवर्षी किमान दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च होत आहे. एकीकडे खर्च वाढत असताना मिळकतकर, बांधकाम शुल्क हे दोनच प्रमुख पर्याय उत्पन्न वाढीसाठी आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेकडून ज्या ठिकाणी कर चोरी होते असे घटक शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महापालिकेने महावितरणशी पत्र व्यवहार करून शहरातील व्यावसायिक मीटर वापरणाऱ्या ग्राहकांची माहिती मागवली आहे. त्यामध्ये सुमारे ३ लाख ५० हजार व्यावसायिकांची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडे केवळ १ लाख ४२ हजार व्यावसायिक मिळकतींची नोंद दिसून येत आहे. त्यामुळे निवासी मिळकती, मोकळ्या जागांचा वापर करून तेथे व्यवसाय केला जात असल्याने महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. मिळकतकर विभागाने पेठ निरीक्षकांना त्यांच्या त्यांच्या भागातील वीज मीटरची माहिती देण्यात आली असून, त्याची पडताळणी करून प्रत्यक्ष जागेवर निवासी मिळकतीमध्ये व्यवसाय सुरू आहे का?, मिळकतीच्या वापराचा हेतू न बदलता तो वापर सुरू आहे का? याची पडताळणी केली जात आहे. तसेच जर व्यावसायिक वापर होत असेल तर तेथे कर लावला जाणार आहे. त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून सुमारे २१ हजार परवान्यांची माहिती मिळाली आहे. तेथेही जाऊन मिळकतीच्या वापराची पडताळणी केली जाणार आहे.
‘शहरात निवासी मिळकतीमध्ये हॉटेल, कार्यालय यासह इतर कारणाने व्यावसायिक वापर केला जात आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. हा व्यावसायिक वापर शोधून काढण्यासाठी महावितरणकडून व्यावसायिक वीज मीटरची व अन्न औषध प्रशासनाकडून परवान्यांची माहिती घेतली आहे. त्याचे विश्लेषण करून प्रत्यक्षात जागेचा होणारा वापर आणि मिळकतकर कोणत्या प्रकारचा आहे याची पडताळणी केली जाणार आहे. त्यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळेल.’
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
शहरातील मिळकतीचे प्रकार - संख्या - उत्पन्न
व्यावसायिक - १.४२ लाख - ८०० ते ९०० कोटी
निवासी - १० लाख - सुमारे १२०० ते १३०० कोटी
मोकळ्या जागा - ३० हजार - ८० ते १०० कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.