खेडमध्ये जणू विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम

खेडमध्ये जणू विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम
Published on: 

राजेंद्र सांडभोर : सकाळ वृत्तसेवा
राजगुरूनगर, ता. ७ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात संचालकपदासाठी जबरदस्त रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. विद्यमान संचालक व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील विरुद्ध आमदार बाबाजी काळे प्रणीत सर्वपक्षीय आघाडी, असा सामना रंगण्याचे संकेत आहेत. ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे.
सध्या माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. आगामी निवडणुकीत ते पुन्हा इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर कोणते राजकीय आव्हान उभे राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तालुक्यातील १०४ सोसायट्यांपैकी १०३ सोसायट्यांचे प्रतिनिधी निवडले गेले आहेत. त्यांच्याबाबत दावे प्रतिदावे सुरू आहेत. मोहिते यांच्या गोटात ७२ प्रतिनिधी असल्याचा दावा स्वतः ते आणि त्यांचे समर्थक करीत आहेत. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया संपल्यानंतर ६९ प्रतिनिधींना घेऊन त्यांनी निमगाव येथे खंडोबाचे दर्शन घेत शक्तिप्रदर्शन केले.
दुसरीकडे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली मोहिते पाटील यांच्या विरोधात विविध राजकीय घटकांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, या संभाव्य आघाडीचे अंतिम स्वरूप, उमेदवार आणि घटक पक्षांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. काळे यांच्या आघाडीकडून तीन चार जण इच्छुक आहेत. स्वतः काळे हेही उमेदवार होण्याची शक्यता आहे. स्वतः आमदार उमेदवार असतील तर प्रतिनिधींना आकर्षित करणे अधिक सोयीचे होईल, असा त्यांचा होरा आहे. शिवसेनेकडूनही (शिंदे) इच्छुकांच्या हालचाली सुरू आहेत. मोहिते यांना शह देण्यासाठी ‘मनी मसल पॉवर’ असलेला उमेदवार देण्याबाबत चर्चा आहे. मोहिते विरोधी आघाडीकडून ५५ मतदार प्रतिनिधी त्यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. अजूनही काही मतदार त्यांना येऊन मिळतील, असा त्यांचा दावा आहे.
बँकिंग रेग्युलेशन कायद्यातील दुरुस्ती सहकारी बँकांसाठी लागू असल्याने मोहिते यांची उमेदवारी टिकणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसेल आणि विरोधी आघाडीला फायदा मिळेल, असा एक तर्क लावला जात आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय चर्चांवरून अंतिम निवडणूक समीकरण ठरविणे घाईचे ठरेल. आता मतदारांवर दबाव, फोडाफोडी, डावपेच सुरू होतील. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते यांना किंवा त्यांच्या बाजूच्या उमेदवाराला पराभूत केले तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची बाजू कमकुवत होईल, असा अंदाज बांधून त्यांचे विरोधक त्यांना पराभूत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करतील, असे दिसत आहे. मतदार प्रतिनिधी निवडताना याचा प्रत्यय आला आहे.
दुसऱ्या बाजूला विधानसभा आणि पंचायत समितीत अपयश आल्याने जिल्हा बँकेची जागा राखणे, मोहिते गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अतिशय निकडीचे आहे. इथे बाजी मारली, तर विधानसभा लढवायला बळ मिळेल आणि कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल, म्हणून तेही सर्वशक्तीनिशी तयारी करताना दिसत आहेत. एकूणच, जिल्हा बँकेच्या संचालकपदाची ही निवडणूक सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहते की आगामी विधानसभा राजकारणावरही तिचा परिणाम होतो, हे निवडणुकीतील पुढील घडामोडींवर स्पष्ट होईल.

आमच्याकडे ७२ मतदार आहेत. यातील एकही कमी होणार नाही, झाली तर वाढच होईल. कोणताही कायदा मंजूर झाल्यानंतर त्याचा अंमल सुरू होतो. पूर्वलक्षी प्रभावाने तो लागू होत नाही. त्यामुळे बँकिंग रेग्युलेशन कायद्यानुसार १० वर्षे येथून पुढे मोजली जातील‌. माझ्या उमेदवारीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही आणि मीच उमेदवार असणार आहे आणि संचालकही मीच होणार आहे.
- दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार, खेड

मोहिते यांच्याविरोधात आमची आघाडी भक्कम आहे. त्यांच्याकडे ४२पेक्षा जास्त संख्या होणार नाही. मुळात मोहिते यांना उभेच राहता येणार नाही. उभे राहिले तरी निवडून येणार नाही. त्यामुळे काहीही झाले तरी यावेळी दिलीप मोहिते जिल्हा बँकेचे संचालक नसतील, हे निश्चित आहे.
- बाबाजी काळे, आमदार, खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com