
लष्कराकडून परिक्षाच रद्द, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता
प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीसह अन्य राज्यातही पोचले, पुणे पोलिस करणार कसून तपास
पुणे : लष्कराच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून उमेदवारांना त्याची विक्री करणाऱ्या सात जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यामध्ये लष्करातील दोन कर्मचाऱ्यांसह एका निवृत्त हवालदार व सैनिक प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुखाचा समावेश आहे. या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून त्याचा तपास केला जात आहे. विशेषतः पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर लष्कराने देशातील 40 केंद्रांवर होणारी "रिलेशन आर्मी शिपाई भरती' ही परिक्षाच रद्द केली आहे.
किशोर महादेव गिरी (वय 40, रा. माळेगाव, बारामती), माधव शेषराव गित्ते (वय 38, रा. सॅपर्स विहार कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (वय 31, रा.बीईजी सेंटर, खडकी, दिघी), उदय दत्तु आवटी (वय 23, रा. बीईजी, खडकी) अशी खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्यांची नावे आहेत. तर गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केलेल्यांमध्ये अली अख्तरखान (वय 47), आजाद लाल महमम्मद खान (वय 37, दोघेही रा. गणेशनगर, बोपखेल, मुळ रा. गाझीपुर, उत्तर प्रदेश), महेंद्र चंद्रभान सोनवणे (वय 37, रा. गायकवाडनगर दिघी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांना लष्करी गुप्तचर विभागाच्या लायझन युनीटकडून यासंदर्भात खबर मिळाली होती.
- रोहित पवारांचा मोदी सरकारला सल्ला; 'पेट्रोल-डिझेल दरवाढ आटोक्यात आणायचीय तर...'
लष्करामधील आजी-माजी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींसाठी भारतीय लष्कराकडून "रिलेशन आर्मी शिपाई भरती' घेतली जाते. या परिक्षेसाठी देशभरातील 40 केंद्रांवर 30 हजार उमेदवार रविवारी 28 फेब्रुवारीला परिक्षा देणार होते. त्याचवेळी काही जणांनी संबंधीत परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याची खबर लष्करी गुप्तचर विभागाने पुणे पोलिसांना दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने वेगाने सुत्रे हलवून शनिवारी रात्री अली अख्तरखान, आझाद खान व महेंद्र सोनावणे या तिघांना अटक केली.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडूनही तपास सुरू होता. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून ती वेगवेगळ्या खासगी सैनिकी प्रशिक्षण संस्थांच्या केंद्र प्रमुखांना विक्री केली जाणार असल्याची ठोस पुराव्यासहीत माहिती प्राप्त झाल्यानंतर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच किशोर गिरी, माधव गित्ते, गोपाळ कोळी, उदय आवटी यांनाही पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून एक प्रश्नपत्रिका जप्त केली. संबंधीत प्रश्नपत्रिका ही रविवारी होणाऱ्या लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले. कोळी हा लष्कराच्या दिघी येथील जो बटालीयन -2 मध्ये कवायत प्रशिक्षक आहे, तर आवटी हा जो रेजीमेंटमध्ये हवालदार या पदावर कार्यरत आहे. गित्ते हा निवृत्त लष्करी कर्मचारी असून त्याची बारामती येथे सैनिक प्रशिक्षण संस्था आहे. या प्रकरणामध्ये लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी घनिष्ट संबंध असण्याची आणि त्याचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोचले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणामध्ये आणखी मोठे मासे पोलिसांच्या गळ्याला लागण्याची शक्यता आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे,यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस उपायुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, संदिप बुवा, शिरीष भालेराव, राजेंद्र लांडगे तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, संदिप जमदाडे, जयदीप पाटील, शितल शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
"भारतीय लष्कराकडून "रिलेशन आर्मी भरती प्रक्रिया' रविवारी देशातील 40 केंद्रांवर होणार होती. त्यासाठी 30 हजार उमेदवार बसले होते. मात्र या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती आम्हाला लष्करी गुप्तचर विभागाकडून मिळाली. त्यानुसार, आम्ही कारवाई करून सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास संवेदनशील असून त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जात आहे.''
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त