
पुणे : २० हजाराची लाच घेताना महावितरण अभियंता एसीबीच्या जाळ्यात
उरुळी कांचन : खुल्या जागेतील प्लॉटमध्ये विद्युत रोहीत्राचा पुरवठ्याची परवानगी देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्विकारताना उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप वासुदेव सुरवसे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता.१०) रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी एका खाजगी विद्युत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. (Pune Crime News)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक खाजगी विद्युत ठेकेदार आहे. ठेकेदाराकडील ग्राहकांच्या मोकळ्या जागेमध्ये नवीन रोहीत्र बसविण्यासाठी तसेच त्याचे अंदाजपत्रक पास करून पुढील कार्यालयाची मान्यता मिळवण्यासाठी २५ हजार रुपयांची सुरवसे यांनी मागणी केली होती. तडजोडी अंती सुरवसे आणि ठेकेदार यांच्यात २० हजार रुपये देण्याचे ठरले होते.
हेही वाचा: पुणे : नळाला दुर्गंधीयुक्त पाणी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार गुरुवारी (ता.१० ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सुरवसे यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील ०२०-२६१२२१३४ क्रमांकवर साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.
Web Title: Pune Crime News Bribe 20 Thousand Arrest Uruli Kanchan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..