Pune Crime News : पानशेत जवळ पुण्यातील तरुणाचा निघृण खुन, दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune crime news Murder of young man Panshet two arrested

Pune Crime News : पानशेत जवळ पुण्यातील तरुणाचा निघृण खुन, दोघांना अटक

वेल्हे,(पुणे ) : पानशेत जवळील आंबीगाव रस्त्यावरील कुरण गावच्या हद्दीतील रानवडी ( ता.वेल्हे ) येथे किरकोळ वादातून पुण्यातील युवकाचा लोखंडी सळईने निघृण खुन करून खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोल खड्ड्यात पुरण्यात आला हा प्रकार आज बुधवारी (ता. १८) रोजी उघडकीस आला.

विजय प्रफुल्ल काळोखे ( वय ३८,रा.कन्या शाळेजवळ, विजय लाॅज बिल्डिंग, अप्पा बळवंत चौक पुणे) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी आरोपी नितीन रामभाऊ निवंगुणे व विजय दत्तात्रय निवंगुणे ( दोघे राहणार,आंबी,ता.हवेली ) यांच्या विरुद्ध खुन, खुनाचा पुरावा नष्ट करणे अशा कलमाखाली वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केले आहे.

हि घटना शुक्रवार ता. १३ रोजी दुपारी दोन ते शनिवार ता.१४ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पानशेत पोलीस चौकीचे पोलिस नाईक अजयकुमार शिंदे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच हवेली विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी वेल्हे तालुका निवासी तहसीलदार सुर्यकांत कापडे व पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलिस नाईक अजयकुमार शिंदे यांना रानवडी येथे आरोपी नितीन निवंगुणे व विजय निवंगुणे यांनी एका व्यक्तीचा खून करुन त्याचा मृतदेह हा नितीन निवंगुणे याच्या शेतात टाकला आहे अशी माहिती आज सकाळी खबऱ्याकडून मिळाली. ही माहिती मिळताच सतर्कतेने वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक महेश कदम हे पानशेत येथे तातडीने दाखल झाले.

नितीन निवंगुणे व विजय निवंगुणे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी दोघांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दोंघाना विश्वासात घेत विचारपुस केली असता नितीन निवंगुणे याने गुन्ह्याची कबुली दिली.

मयत विजय काळोखे हा मानसिक त्रासात असल्याने त्याने नितीन याला फोन करून पुण्यात भेटण्यास बोलविले होते. तेथुन मयत विजय काळोखे व नितीन निवंगुणे हे मोटारसायकलवरून आंबीला चालले होते.

आंबी रस्त्यावरील रानवडी येथील नितीन निवंगुणे याच्या शेतातील पत्र्याचे कंपाउंड उघड़े दिसल्याने ते बंद करण्यासाठी नितीन तेथे थांबलो. त्यावेळी मयत विजय काळोखे हा कंपाऊंड मध्ये आला .तेथे विजय काळोखे हा नितीन याला शिवीगाळ करू लागला. नितीन याने त्याला शिवीगाळ करु नको असे सांगूनही तो शिवीगाळ करत होता.

त्यावेळी नितीन याचा चुलत भाऊ विजय दत्तात्रय निवगुणे हा तेथे आला. त्याने नितीन व मयत विजय काळोखे यांच्यातील भांडणे पाहुन काय झाले असे विचारले . त्यावेळी मयत विजय काळोखे हा विजय निवंगुणे यास शिवीगाळ करु लागला.

त्यामुळे रागात विजय निवंगुणे याने शेजारीच पडलेली वीट विजय काळोखे याच्या डोक्यात घातली. त्यानंतरही मयत विजय शिवीगाळ करत दोघांवर धावुन आला. त्यानंतर नितीन व विजय निवगुणे यांनी लोखंडी अँगल व रॉडने विजय काळोखे याचा निघृण खुन केला.

नितीन निवंगुणे याने शेतात घर बांधण्यासाठी एक वर्षांपूर्वी खोल पाया घेतला होता. त्या खोल खड्ड्यात विजय काळोखे याचा मृतदेह पुरून ठेवला होता.