esakal | शिरुरमधील हॉटेलमध्ये वेटरनेच वेटरचा गळा चिरून केली निर्दयीपणे हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

शिरुरमधील हॉटेलमध्ये वेटरनेच वेटरचा गळा चिरून केली निर्दयीपणे हत्या

शिरुरमधील हॉटेलमध्ये वेटरनेच वेटरचा गळा चिरून केली निर्दयीपणे हत्या

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

टाकळी हाजी : चिंचोली मोराची ( ता. शिरूर ) येथील मैत्री हॉटेल मध्ये वेटरनेच वेटरचा गळा चिरून निर्दयीपणे खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये रमेश सुखदेव शर्मा ( वय ५१) राहणार कऱ्हाड, जि. सातारा हे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपी विठठल मोरे (वय ३५ ) पानशेत ता. कंधार जि नांदेड हा फरार झाला आहे. या बाबत हॉटेल मालक गणेश धुमाळ यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचोली मोराची ( ता. शिरूर ) येथील मैत्री हॅाटेलमध्ये मयत रमेश शर्मा व आरोपी विठ्ठल मोरे हे वेटरचे काम करीत होते. यांच्यामध्ये काहीतरी वाद झाल्यांने मोरे यांनी रविवारी रात्री झोपत असलेल्या रमेश शर्मा यांच्या गळ्याला धारदार चाकूने कापले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. खून करून आरोपीने धूम ठोकली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी आठवाजता हॉटेल मालक गणेश धुमाळ आले असता त्यांनी हा प्रकार पहाताचं पोलिसांना खबर दिली.

हेही वाचा: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण

आरोपी मोरे हा फरार असून पोलिस त्यांचा तपास करीत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविण खाणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरुदेव काबुगडे, पोलिस हवालदार राजेंद्र गवारे करीत आहेत. सध्या लॉकडाऊन असला तरी या भागातील सर्वच धाब्यावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असून हा प्रकार दारूच्या नशेत झाले असल्याची चर्चा होत आहे.

धाब्यावर दारू बंद होणार का

लॅाकडाऊन असल्यामुळे परीसरात दारू विक्रीला बंद आहे. पण मागच्या दरवाज्याने दारू विक्री होत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध्य दारू विक्री होत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी होऊ लागली आहे. या धाब्यांवर दारू विक्री बंद होणार का असा सवाल नागरिकांमधून होऊ लागला आहे.