
करणी झाल्याचे सांगून एकाने लुटले 50 लाख; तर दुसऱ्याकडून महिलेचा विनयभंग
पुणे : महिलेवर करणी झाल्याचे सांगून भोंदू बाबाने अघोरी कृत्य करीत महिलेकडून तब्बल 50 लाख 30 हजार रुपये उकळले. तर त्याच्याकडून पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने दुसऱ्या व्यक्तीने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोंदू बाबासह दोघांना खडक पोलिसांनी अटक केली. (Pune Crime News)
राजेंद्र बलराम कन्ना (वय 45, रा. महात्मा फुले पेठ), मनिष बापूराव शिंदे (वय 42, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन विनयभंग, फसवणूक, संगनमत करुन धमकावणे आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2018 ते 2019 या कालावधीमध्ये घडला आहे.
हेही वाचा: आण्णा हजारेंनी वाईनविक्रीला विरोध करु नये; द्राक्षे उत्पादकांची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई आजारी होत्या. त्यांच्यावर त्या उपचार करीत होत्या. त्यावेळी त्या राजेंद्र कन्ना या महाराजाच्या संपर्कात आल्या. त्यावेळी त्याने फिर्यादीस तुमच्या आईवर नातेवाईकाने करणी केल्याचे सांगितले. करणी काढण्यासाठी त्याने कागदी चिठ्ठ्या तयार केल्या. काळी बाहुली, लिंबू, हळद, कुंकु यांचा वापर करुन होमहवनही करीत जादुटोण्यासारखे अघोरी कृत्य करून फिर्यादीचा विश्वास प्राप्त केला.
त्यानंतर फिर्यादीस वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून 50 लाख 30 हजार रुपयांची रक्कम घेतली. दरम्यान, शिंदे याने फिर्यादीस कन्ना याच्याकडून रक्कम मिळवून देतो, असे सांगून फिर्यादीसोबत अश्लिल चाळे करीत त्यांचा विनयभंग केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाणे गाठून कन्ना व शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Web Title: Pune Crime News Women Harrasment Khadaki Criminal Arrest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..