Pune Crime : चोरीचे 14 मोबाईल व एक दुचाकी हस्तगत, सात गुन्ह्यांमधील पावणेदोन लाखाचा मुद्देमाल ताब्यात pune crime police investigation mobile fraud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Pune Crime : चोरीचे 14 मोबाईल व एक दुचाकी हस्तगत, सात गुन्ह्यांमधील पावणेदोन लाखाचा मुद्देमाल ताब्यात

Pune Crime - सराईत चोरट्याकडून विश्रांतवाडी पोलिसांनी वाहनचोरीसह मोबाईल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणून पावणे दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सुलतान उर्फ हाफिज मोहम्मद शेख (वय 20, रा. खडीमशीन चौक, कोंढवा) याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केले आहे.

या सराईत आरोपीवर शहरात यापूर्वी 20 गुन्हे दाखल असून विश्रांतवाडी पोलिसांनी आणखी सात गुन्हे तपासात उघड केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 मे रोजी शांतीनगर येथील रस्त्यावर दुचाकीवरील एक इसम हातात कोयता घेऊन लोकांच्या अंगावर धावून जात दहशत निर्माण करत होता.ही माहिती मिळताच तात्काळ विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्या व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक तपास केला असता तो पूर्वरेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून एकूण 14 वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे मोबाईल व एक दुचाकी असा एकूण एक लाख 60 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हे मोबाईल व दुचाकी चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सुलतानवर यापूर्वीचे एकूण वीस गुन्हे दाखल असून विश्रांतवाडी पोलिसांनी केलेल्या तपासात विमानतळ, भारती विद्यापीठ, बिबेवाडी पोलीस स्टेशनकडील प्रत्येकी एक, तर लोणीकंद मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडे दोन असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याजवळ मिळालेली दुचाकी हीदेखील बिबवेवाडी येथून चोरी केल्याचे त्याने कबूल केले.

अपरपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे निरीक्षक कविदास जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते, पोलीस अंमलदार दीपक चव्हाण, यशवंत किरवे, संपत भोसले, संजय बादरे, संदीप देवकाते, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे यांच्या पथकाने या आरोपीला अटक केले.