

पुणे, ता. १३ : नैसर्गिक आपत्तीच्या वाढत्या जोखमीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात यंदा ८३ हजार ३७ शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा उतरविला आहे. त्यातून ३९ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले असून, या पिकांची एकूण विमा संरक्षित रक्कम २३८ कोटी ७२ लाख सहा हजार रुपये आहे. जिल्ह्यातील खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र दोन लाख २५ हजार हेक्टर असताना त्यापैकी सुमारे १८ टक्के क्षेत्र विम्याच्या कक्षेत आले आहे.
यंदा पीकविम्यासाठी सहभागी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये १३ हजार १२९ कर्जदार, तर ६९ हजार ९०८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात खरीप पिकांखालील सरासरी क्षेत्र सुमारे दोन लाख २५ हजार हेक्टर आहे. त्या तुलनेत विमा उतरविण्यात आलेले क्षेत्र ३९ हजार ७०२ हेक्टर म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या सुमारे १८ टक्के आहे. सोयाबीन, कांदा, बाजरी आणि भात या पिकांसाठी विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांच्या संख्येत पुरंदर तालुका आघाडीवर आहे. तालुक्यातील १५ हजार ७६६ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. त्याखालोखाल इंदापूरमध्ये १४ हजार ५५२, जुन्नरमध्ये ११ हजार ९२३ आणि खेडमध्ये दहा हजार नऊ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
तालुकानिहाय सहभागी शेतकरी
पुरंदर : १५,७६६
इंदापूर : १४,५५२
जुन्नर : ११,९२३
खेड : १०,००९
आंबेगाव : ६,८८३
बारामती : ६,५११
राजगड : ५,६६८
शिरूर : ५,३००
दौंड : १,८८४
मावळ : २,०७२
भोर : १,१४०
मुळशी : १,०१२
हवेली : ३१७
सोयाबीनला सर्वाधिक अर्ज
पीकनिहाय आकडेवारीनुसार सोयाबीनचे २७ हजार ३० शेतकरी अर्ज असून, १३ हजार ९८०.३७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. कांद्यासाठी १७ हजार ४२९ शेतकऱ्यांनी नऊ हजार ७०२.७८ हेक्टर, भातासाठी १५ हजार २१० शेतकरी अर्जांद्वारे सहा हजार ३२१.२० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविण्यात आला आहे. बाजरीसाठी दहा हजार ६१७ शेतकऱ्यांनी चार हजार ३१५.०४ हेक्टर, तर तुरीसाठी एक हजार ५७० शेतकऱ्यांनी ७७२.४९ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. तर भुईमुगासाठी चार हजार ८८६, मक्यासाठी चार हजार ४१२ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा आर्थिक फटका कमी करण्यासाठी विम्याचे कवच उपयुक्त ठरते. यंदा बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. गावपातळीवरील कामामुळे योजनेबाबतची माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.