पुण्यात रात्रीच्या वेळी प्रवासाची व्यवस्था काय? पोलिस आयुक्तांनी दिली माहिती

Pune_Lockdown
Pune_Lockdown

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने संचारबंदीचे आदेश दिले, या आदेशांची पोलिसांकडून शनिवारपासून अंमलबजावणीही सुरू झाली. मात्र संबंधीत आदेशामध्ये ओळखपत्र नसणाऱ्या घरेलू कामगार, असंघटीत कामगार तसेच रात्रीच्यावेळी प्रवाशांना ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेबाबत कुठलीच स्पष्टता करण्यात आलेली नाही. तरीही संबंधीत घटकांना त्रास होणार नाही, त्यांचाही संवेदनशीलतेने विचार करून योग्य दखल घेतली जाईल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांची मात्र गय केली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

सायंकाळी सहा वाजता संचार बंदी सुरू झाल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शनिवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात रस्त्यावर उतरून पाहणी करीत होते. शहरात ठिकठिकाणी बॅरीकेडस लावून पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नागरीकांची चौकशी केली जात होती. त्याच पद्धतीने काही ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः नागरीकांना थांबवून त्यांची चौकशी करून सोडले. 

नागरीकांनी योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, ज्या कारणासाठी ते बाहेर येत आहेत, त्याविषयीची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सबळ कारण असणाऱ्या नागरीकांना सहकार्य केले जाईल, तर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केले. 

ओळखपत्र, कंपन्यांचे पत्र, आवश्‍यक कागदपत्रे जवळ बाळगावीत 
रात्री शहरातुन ये-जा करणाऱ्या कामगारांनी त्यांचे कंपन्या, आस्थापानांचे ओळखपत्र किंवा त्यांनी दिलेले पत्र स्वतःजवळ ठेवावे. तसेच वैद्यकीय,प्रवास किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी बाहेर पडताना वैध कागदपत्रे जवळ ठेवावीत. त्यांची पोलिसांकडून अडवणूक होणार नाही. 

प्रवाशांसाठी रात्रीच्या वाहतुक व्यवस्थेचे काय? 
रात्रीच्यावेळी शहरात येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना घरी किंवा इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था कशी असणार आहे, हा प्रश्‍न नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. त्याबाबतही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रात्रीच्यावेळी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे वैध कारण तपासले जाईल. त्यांच्याकडे प्रवासासाठीचे योग्य कारण, बस तिकीट, अन्य कागदपत्रे पाहिली जातील. रात्रीच्यावेळी अडकलेल्या प्रवाशांना वाहतुक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सुचना पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्तांना दिल्या आहे. त्यांच्यामार्फत संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले आहे. "वेळप्रसंगी पोलिस स्वतःच्या वाहनांमधून नागरीकांना पोचवतील' असे डॉ.शिसवे यांनी स्पष्ट केले.

असंघटीत, कष्टकऱ्यांसाठीची व्यवस्था काय ? 
संचारबंदीमध्ये घरेलु कामगार, बांधकाम मजूर यांच्यासह असंघटीत क्षेत्रातील लोकांना सर्वाधिक त्रास होण्याची शक्‍यता आहे. संघटीत क्षेत्रातील लोकांना त्यांच्या आस्थापनांकडून ओळखपत्र, पत्र मिळू शकते. त्याच पद्धतीने असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्यांनीही ते जेथे काम करतात, त्यांच्याकडून ते त्यांच्याकडे काम करीत असल्याबाबतचे पत्र स्वतःजवळ ठेवल्यास, पोलिसांकडून त्यांना सहकार्य केले जाणार आहे. 

"कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ही संचारबंदी आहे. पुणेकर सजग असून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळले आहे. शनिवारी वेळेत आस्थापना बंद झाल्या. बहुतांश नागरीक, कामगार, कर्मचारी वेळेत घरी पोचले आहेत. कोणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत. संचारबंदी आम्ही संवेदनशीलतेनेच हाताळत आहोत.''
- डॉ. रविंद्र शिसवे, सहपोलिस आयुक्त. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com