

अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ : सीबीआय, कस्टम्स आणि मुंबई क्राइम ब्रांचचे तोतया अधिकारी बनून ‘डिजिटल अरेस्ट’ आणि इतर गुन्ह्यांत नागरिकांची कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या आंतरराज्य सायबर गुन्हेगारांनी पुण्यात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांची कोट्यवधी रुपयांची लूट होत असताना सायबर गुन्ह्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांकडे पुरेशी यंत्रणाच नाही. त्यासाठी शहरात अत्याधुनिक सायबर फॉरेन्सिक लॅबसह अभियंते, कायदेतज्ज्ञ आणि प्रशिक्षित पोलिसांची गरज आहे.
‘तुमच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले आहेत’ किंवा ‘बँक खात्यातून मनी लाँड्रिंग झाले आहे,’ अशी बतावणी करत नागरिकांना कॉल केले जातात. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर बनावट पोलिस ठाणे, न्यायालयाचा देखावा आणि खोटे वॉरंट दाखवून ‘तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे,’ असा मानसिक दबाव टाकला जातो. तपासणीच्या बहाण्याने नागरिकांच्या आयुष्यभराची पुंजी, मुदत ठेवी बनावट (म्यूल) खात्यांवर वळवून घेतल्या जातात. अवघ्या काही मिनिटांत ही रक्कम देशातील विविध राज्यांत फिरवून एटीएम किंवा क्रिप्टोकरन्सीद्वारे लंपास केली जात आहे.
पुणे शहर : सायबर फसवणूक दृष्टिक्षेपात
तपशील- वर्ष २०२५- वर्ष २०२६ (जानेवारी ते ऑगस्ट)
सायबर तक्रारी- ३० हजार- २१ हजार
आर्थिक फसवणूक - ७८ टक्के - ८२ टक्के
डिजिटल अरेस्ट - १२५ - ९५
फसवणूक रक्कम- १६० कोटी- ११० कोटी रुपये
डिजिटल अरेस्टद्वारे फसवणूक- ४८ कोटी- ४० कोटी
हेल्पलाइन ‘१९३०’ वरील अडचणी आणि उपाय-
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर आणि ‘१९३०’ या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ वाढला आहे. मात्र, दूरध्वनी व्यस्त लागणे, कॉल ड्रॉप होणे किंवा व्यवहाराचा युटीआर क्रमांक तत्काळ न मिळाल्याने तक्रार नोंदणीत वेळ जातो. त्यातच फसवणूक झालेली रक्कम गोठवण्याचे प्रमाण नगण्य आहे.
दूरध्वनी न लागल्यास हे करा :
१. www.cybercrime.gov.in या पोर्टलवर जाऊन ‘रिपोर्ट सायबर फ्रॉड’ अंतर्गत स्वतः तक्रार नोंदवा.
२. बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून खाती, नेट बँकिंग आणि युपीआय तत्काळ ब्लॉक करा.
३. तक्रार करताना व्यवहाराचा यूटीआर क्रमांक, अचूक वेळ, तारीख आणि चोरट्यांची बनावट नोटीस, पत्रांचे स्क्रीनशॉट्स सोबत ठेवा.
कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. पोलिस किंवा कोणतीही केंद्रीय तपास यंत्रणा व्हिडिओ कॉलवर कोणालाही अटक करत नाही किंवा पैशांची मागणी करत नाहीत. अशा कॉल्सना बळी न पडता नागरिकांनी तत्काळ कॉल तोडून १९३० किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा.
- विवेक मासाळ,
पोलिस उपायुक्त, सायबर गुन्हे, पुणे शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.