नवीन ७५ किलोमीटरचे सायकल ट्रॅक

नवीन ७५ किलोमीटरचे सायकल ट्रॅक
Published on: 

पुणे, ता. २२ : रस्ते अरुंद होत आहेत म्हणून शहरातील पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक काढून टाकून वाहनांना वाट मोकळी करून देण्याचे नियोजन केले होते. आता शहरात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होत आहे, त्यानिमित्ताने ७५ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक नव्याने तयार करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. पण सध्याच्या सायकल ट्रॅकची स्थिती कधी सुधारणार, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

पुणे हे ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळखले जायचे. आता ही जागा दुचाकी आणि चारचाकींनी घेतली आहे. असे असले तरी आजही अनेक विद्यार्थी, कामगार सायकल वापरतात. पण त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे. पुणे शहरात गेल्यावर्षीपासून ‘पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते खड्डेमुक्त होत आहेत. चेंबर समपातळीत येत आहेत. महापालिका या स्पर्धेच्या निमित्ताने का होईना पण रस्ते चांगले करत आहे, अशी भावना पुणेकरांची आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी पथ विभागाला ७५ किलोमीटरचे सलग, सुरक्षित सायकल ट्रॅक विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारी (ता. १९) झालेल्या बैठकीत ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी’ संस्थेने याबाबत सादरीकरण केले. पुढील टप्प्यात हे जाळे १३६ किलोमीटरपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. गणेशखिंड रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सायकल ट्रॅकचाही विचार सुरू आहे. ही कामे ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ स्पर्धेशी जोडली जाणार आहेत. मात्र, नव्याने ट्रॅक उभारताना जुन्या ट्रॅकची दुरुस्ती आणि त्यावरील अडथळे दूर करणे आवश्यक आहे. अन्यथा नव्या ट्रॅकवर पुन्हा खर्च होईल; पण सायकलस्वारांची गैरसोय कायम राहील.

सध्याच्या सायकल ट्रॅकची दुरवस्था
- सायकल स्पर्धेमुळे रस्ते चांगले होत आहेत. पण शहरातील हौशी सायकलस्वार तसेच नियमित सायकल चालविणारे नागरिक यांच्यासाठी महापालिका चांगल्या सुविधा पुरवत नाही.
- जेथे सायकल ट्रॅक आहेत त्यावरचे पेव्हिंग ब्लॉक खचलेले आणि तुटलेले आहेत.
- अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत तसेच हा सायकल ट्रॅक अतिशय खडबडीत असल्याने पाठीला झटके बसतात. त्यामुळे सायकल ट्रॅक वापरला जात नाही.
- काही ठिकाणी बोलार्ड लावल्याने सायकल मार्गांची सलगता तुटते. त्यामुळे स्वतंत्र ट्रॅक असूनही सायकलस्वारांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

पुण्यात आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड टूर’ ही सायकल स्पर्धा घेतली जाते. मात्र, सायकल चालवणाऱ्यांसाठी चांगले ट्रॅक शहरात नाहीत. त्यामुळे येत्या काळात ७५ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रॅकवर अतिक्रमण किंवा अन्य अडथळे होणार नाहीत याची काळजी घेऊ.
- नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com