
पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झालेला असताना अतिक्रमणे, रस्त्यावरील अनधिकृत होर्डिंग यांसह अन्य कारणांनी त्यात आणखी भर पडत आहे. याविरोधात आज पुण्यातील आमदारांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवला. शहरातील विदारक स्थिती सभागृहात मांडून २०४७ पर्यंतचे नियोजन सोडा, आत्ता पुण्यातील कोंडी सोडविण्यासाठी काय करणार? ते सांगा, नागरिकांना दिलासा द्या, अशी आर्त हाक आमदारांनी दिली आहे. सुमारे तासभर केवळ पुण्यातील कोंडी, प्रस्तावित प्रकल्प, सुरू असलेल्या कामाची गती वाढविणे असे मुद्दे आमदारांनी मांडले. यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेणार असल्याचे तालिकाध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितले.