धीरज घाटे यांच्या खुनाच्या कटातील तिघांना शुक्रवारपर्यंत कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कोठडी

धीरज घाटे यांच्या खुनाच्या कटातील तिघांना शुक्रवारपर्यंत कोठडी

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या खुनाचा कट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने (Court) शुक्रवारपर्यंत (ता. १०) पोलिस (Police) कोठडी सुनावली आहे. विकी ऊर्फ वितुल वामन क्षीरसागर (वय ३३), मनोज संभाजी पाटोळे (वय ३३, दोघेही रा. साने गुरुजी वसाहत, नवी पेठ) आणि महेश इंद्रजित आगलावे (वय २५, रा. लोहियानगर) यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत धीरज रामचंद्र घाटे (वय ४६, रा. स्नेहनगर, नीलायम चित्रपटगृहाजवळ, सदाशिव पेठ) यांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगळवारी (ता. ७) रात्री उशिरा विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शेडगे आणि निखिल मोहिते यांचा पोलिस शोध घेत आहेत.

घाटे हे त्यांचे कार्यकर्ते अमर साबळे यांच्यासह शुक्रवारी (ता. ३) शास्त्री रस्त्‍यावर असलेल्या हॉटेल सॅफ्रनमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांच्या मागून तीन व्यक्ती येऊन बसल्या. त्यातील एकाच्या हातात काळी पिशवी होती. त्यांच्या संशय आल्याने साबळे हे हॉटेलच्या बाहेर गेले. त्यावेळी त्यांना क्षीरसागर आणि पाटोळे हे बाहेर थांबलेले दिसले. याकाळात घाटे यांनी संजय धोत्रे यांना बोलावून घेतले होते. संबंधित व्यक्तींचे घाटे आणि त्यांच्या साथीदारांवर लक्ष असल्याने तिघेही तेथून बाहेर पडले.

घाटे बाहेर पडल्यानंतर संबंधित तीन पैकी एक व्यक्ती हा क्षीरसागर आणि पाटोळे यांच्याशी बोलत थांबला होता. त्यानंतर घाटे यांनी सोमवारी (ता. ६) हॉटेल आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले व फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक अभय महाजन तपास करत आहेत.

आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला? गुन्ह्याचा कट कुठे रचला गेला? अटक आरोपीं व्यतिरिक्त अजून कोण सूत्रधार आहे का? आरोपींजवळ असलेल्या काळ्या बॅगमध्ये काय होते? याचा तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षा आसलेकर यांनी केला. आरोपींची बाजू ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार आणि ॲड. दिग्विजय ठोंबरे यांनी मांडली. संबंधित गुन्हा हा खोटा व बनावट असून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन तो दाखल करण्यात आला आहे, असा युक्तिवाद ॲड. ठोंबरे यांनी केला.

टॅग्स :Pune Newscrime