
मधुमेहामुळे वयाची पन्नाशीही न ओलांडलेल्या काही रुग्णांना नियमित डायलिसिस करावे लागत आहेत.
Dialysis : कमी वयातच मधुमेहींना डायलिसिसचा विळखा!
पुणे - मधुमेहामुळे वयाची पन्नाशीही न ओलांडलेल्या काही रुग्णांना नियमित डायलिसिस करावे लागत आहेत. त्यामुळे डायलिसिस केंद्रांवरील रुग्णांचा ताण सातत्याने वाढत असून, यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निरीक्षण मधुमेह तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
देशात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पूर्वी वयाच्या चाळिशी-पन्नाशीनंतर निदान होणारा मधुमेह आता विशी-पंचविशीच्या वयातील मुला-मुलींमध्ये सहजतेने दिसतो. मधुमेह झालेल्या रुग्णांनी जीवनशैलीत आमूलाग्र बदल करणे आवश्यक असते. आहार, व्यायाम आणि ताणतणावरहित जीवनशैली हे यातील महत्त्वाचे घटक ठरतात. पण, आधुनिक काळात विशेषतः शहरातील धकाधकीच्या जीवनामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्याचे आव्हान सातत्याने वाढत असल्याचे दिसते. अनियंत्रित मधुमेहाचा थेट परिणाम डोळे, रक्तवाहिन्या, हृदय, रक्तदाब यावर होतो तसाच गंभीर दुष्परिणाम मूत्रपिंडावरही होतो. मधुमेहामुळे मूत्रपिंडाचे विकार वाढल्याचे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.
सुरुवात कशी होते?
शरीरात इन्शुलिन तयार करण्याचे कार्य स्वादुपिंड करते. या इन्शुलिनमुळे रक्तातील साखर योग्य प्रमाणात ठेवली जाते. मधुमेहामुळे स्वादुपिंडाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्वादुपिंडाला पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार करता येत नाही. किंवा त्याचा योग्य पद्धतीने वापर करून साखर नियंत्रित ठेऊ शकत नाही. त्यातून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्याचा थेट परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होतो.
मूत्रपिंडावरील दुष्परिणाम
मधुमेहाचा थेट दुष्परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. मूत्रपिंडाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता कमी होते. त्यातून मूत्रपिंडाचे कार्य बिघडते. रक्तातील विषारी घटक शरीराबाहेर टाकण्याच्या मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. हे मूत्रपिंडाचे कार्य कमी होण्याची ही धोक्याची पातळी ठरते. मधुमेहामुळे मूत्रपिंडावरील वाढलेले दुष्परिणाम नियंत्रित करण्याचे सर्व उपाय निष्फळ ठरतात त्या वेळी रुग्णाला डायलिसिस करावे लागते.
मूत्रपिंड विकाराची प्रमुख लक्षणे
उच्च रक्तदाब
थकवा येणे
अचानक वजन घटणे
वारंवार लघवीला जावे लागणे
पूर्वी मधुमेहाचे निदान सेवानिवृत्तीच्या वयाच्या आसपास होत असे; पण ते आता तरुण वयात होते. त्यामुळे दीर्घकाळ अनियंत्रित मधुमेह असल्यास त्याचा दुष्परिणाम मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर निश्चित होतो. त्यातून वयाच्या चाळिशीतही डायलिसिस काही रुग्णांना करावे लागते. या आधी ज्येष्ठ नागरिकांमध्ये डायलिसिसचे प्रमाण जास्त होते.
- डॉ. सुनील जावळे, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ, संजीवन रुग्णालय
आई-वडिलांना मधुमेह होता, त्यामुळे मला वयाच्या चाळिशीत मधुमेहाचे निदान झाले. दहा-बारा वर्षे कामाच्या ताणतणावात गेले. या दरम्यान मधुमेहाकडे दुर्लक्ष झाले. त्याचा थेट फटका आता बसत आहे. डोळ्याच्या पडद्याच्या रक्तवाहिन्यांवर जसा परिणाम झाला आहे, तसाच मूत्रपिंडावरही सुरू झाला आहे. त्यासाठी पहिले डायलिसिस मला करावे लागले.
- उमाकांत जगताप, रुग्ण
आयुष्यभर डायलिसिस लागणार हे नक्की झालेल्या रुग्णांसाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे वरदान ठरते. त्यातून रुग्णाला डायलिसिस करावे लागत नाही.
- डॉ. आदित्य देशपांडे, मूत्रपिंड शल्यचिकित्सक, संजीवन रुग्णालय