Vidhan Sabha 2019 :  रणधुमाळीला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी १०४ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले.

विधानसभा 2019
दिवसभरात २१ जागांसाठी १०४ जणांचे अर्ज दाखल

पुणे -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी १०४ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार शुक्रवारी (ता. ४ ) अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस असल्याने जिल्ह्यातील लढतीचे चित्र त्यानंतर स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपची दुसरी यादी मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पक्षांच्या बहुतेक उमेदवारांनी आजचा मुहूर्त काढून उमेदवारी अर्ज दाखल केले. आपापल्या मतदारसंघांत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपापल्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पुणे शहरात भाजपच्या आठही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मनसे, काँग्रेसच्या काही उमेदवारांनीही पक्षाच्या नेत्यांसोबत अर्ज दाखल केले. पुण्यातील आठ मतदारसंघांत आज ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरांची समजूत घालत मिरवणुकीने येऊन अर्ज भरला. आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सुनील कांबळे, वसंत मोरे, सिद्धार्थ शिरोळे आदींचा अर्ज भरणाऱ्यांमध्ये समावेश आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी खडकवासला, तर नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा मतदारसंघात बंडखोरी करीत अर्ज दाखल केले. ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, नगरसेवक रवींद्र धंगेकर, पल्लवी जावळे, सदानंद शेट्टी, डॉ. भरत वैरागे, रूपाली पाटील यांची भूमिका शुक्रवारी स्पष्ट होईल.

पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार गौतम चाबुकस्वार, लक्ष्मण जगताप यांच्यासह १५ जणांनी अर्ज दाखल केले. पिंपरी-चिंचवडमध्येही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. जिल्ह्यात इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार, संजय जगताप हे उमेदवार शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्ह्यात आज दिवसभरात ४६ अर्ज  दाखल झाले.

लक्ष कोथरूडकडे 
कोथरूड मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात एकच उमेदवार असावा, यासाठी विरोधी पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आघाडीच्या मित्रपक्षांकडून निवडणूक लढवावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरडे यांनी अद्याप होकार दिलेला नसल्याचे समजते. या ठिकाणी मनसेच्या वतीने किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोथरूडच्या लढतीचे चित्र शुक्रवारीच स्पष्ट होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune district 21 assembly 104 people filing of nominations