पुणे जिल्ह्यातील ३०० गावांचे नकाशे पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drone

राज्यातील ३८ हजार गावठाणांचा भारतीय सर्वेक्षण विभागाद्वारे ड्रोनच्या माध्यमातून नकाशे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Pune Villages Map : पुणे जिल्ह्यातील ३०० गावांचे नकाशे पूर्ण

वडगाव शेरी - राज्यातील ३८ हजार गावठाणांचा भारतीय सर्वेक्षण विभागाद्वारे ड्रोनच्या माध्यमातून नकाशे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, हवेली तालुक्यातील साधारणतः तीनशे गावांचे नकाशे तयार झाले आहेत. तसेच नागपूर, औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यातील गावठाणांचे नकाशे तयार झाले आहेत.

भूमि अभिलेख विभागाने आतापर्यंत गावठाणातील दहा हजार ‘प्रॉपर्टी कार्ड’ वितरित केले असून, वर्षाअखेर सर्वांना प्रॉपर्टी कार्ड मिळतील, अशी माहिती भारतीय सर्वेक्षण विभागाचे संचालक कर्नल सुनील फत्तेपूर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘भूमि अभिलेख प्रत्येक गावठाणातील रस्ते, मालमत्ता, गावठाणाच्या चतुःसीमा आदींच्या सीमारेषा चुन्याच्या साहाय्याने आखून घेतात.

त्यानंतर ड्रोनमध्ये असलेल्या ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’द्वारे (जीएनएसएस) अवघ्या काही मिनिटांत अनेक छायाचित्रे घेतली जातात. सॉफ्टवेअरमध्ये प्रक्रिया केल्यानंतर सर्व छायाचित्रांचा नकाशा तयार केला जातो. या नकाशामध्ये गावठाणातील प्रत्येक मालमत्तेचे विवरण असते. त्यानंतर भूमि अभिलेख शहानिशा करून प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड देते. या प्रॉपर्टी कार्डच्या वितरणानंतर नागरिकांच्या मालमत्तेसंदर्भात काही अडचणी, सूचना विचारात घेऊन त्याची दुरुस्तीही केली जाते.’’

नगर नियोजनासाठी उपयोगी...

गावांचे तयार केलेले नकाशे हे १:५०० सेमी प्रमाणात आहेत. त्यामुळे नगर नियोजन करणे गावठाणांना सहज शक्य आहे. स्वामित्व प्रकल्पांतर्गत गावठाण ग्रामस्वराज्याच्या दिशेने जात आहेत. आता सरपंच व सदस्य गावाचे सूक्ष्म नियोजन करू शकतील. गावातील मोकळ्या जागा, येथील आरक्षणे, बागा, शाळेच्या इमारतीसाठी जागा, मैदाने, मनोरंजन केंद्र इत्यादी लोकोपयोगी जागेचे आरक्षण करू शकतात. त्यामुळे गावातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते, जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या, वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी लोकसंख्येचे भविष्यातील वाढ विचारात घेऊन त्याचे नियोजन करू शकतात.

७६ कोटींची तरतूद...

महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, जे ३८ हजार गावांचे नकाशे ड्रोनद्वारे तयार करीत आहेत. यासाठी ७६ कोटींची तरतूद राज्य सरकारने केली आहे. एका अत्याधुनिक ड्रोनची किंमत १५ लाख रुपये आहे. लहान गावाचे पाच ते सात मिनिटांत छायाचित्रे घेतली जातात, तर उरुळी कांचनसारखे मोठे गाव असल्यास ६० मिनिटांचा कालावधी लागतो, अशी माहिती प्रशासन व लेखाधिकारी बी. के. सोनपरोते यांनी दिली.

टॅग्स :puneVillagesDronemap