
जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आज शिंदे गटात
खडकवासला - पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे हे आज एकनाथ शिंदे यांच्या गटात शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत प्रवेश करणार आहेत. कोंडे हे १९९५ पासून शिवसेनेत आहेत. खेड शिवापुरचे सरपंच, हवेली तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाप्रमुख अशा पदावर त्यांनी काम केले आहे.
राज्यातील महिनाभरात झालेल्या घडामोडी सुरू असताना मुंबई येथील पक्षाच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीला ते सतत उपस्थित होते. त्याचबरोबर, रविवारी खडकवासला मतदार संघाचे नवीन संपर्क प्रमुख राजेश खाडे यांनी बैठक पुण्यातील शिवसेना भवन येथे आयोजित केली होती. त्या बैठकीत रमेश कोंडे उपस्थित होते. तेथेच त्यांनी बैठकीपूर्वी काल मी मातोश्रीवर होतो. आज तरी मी तुमच्या सोबत आहे. उद्या मुख्यमंत्र्यांचा फोन येऊ शकतो.
मी कोणत्याही पदाधिकाऱ्यांना आग्रह करणार नाही. माझा मित्र परिवार सोबत असतील. असे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून आज रमेश कोंडे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले. कोंडे पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर, खडकवासला व बारामती या विधानसभा मतदार संघाचे जिल्हा प्रमुख पद होते. त्यानंतर, शहर प्रमुख म्हणूननियुक्ती केली परंतू नंतर ग्रामीण भाग त्यांच्याकडे दिला होता. त्यामुळे देखील नाराज होते.
'सकाळ' शी बोलताना रमेश कोंडे यांनी सांगितले की, खडकवासला मतदार संघातील खेड शिवापुरला गुंजवणीचे पाणी मिळाले पाहिजे, अनेक अनधिकृत इमारती बांधल्या आहेत त्याचा मोठा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्याच्या दृष्टीने मी ही भूमिका घेत असल्याचे सांगितले
दरम्यान, माजी मंत्री उदय सामंत यांची व त्याची भेट झाली होती. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक वेळी गावी साताऱ्याला जाताना आवर्जून खेड शिवापुर येथे थांबत होते. नगरविकास खात्यांतर्गत असलेल्या 'पीएमआरडीए'च्या माध्यमातून शिंदे यांनी कोंडे यांनी निधी देऊन मदत केली होती. तसेच, शिंदे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सदस्यपदी कोंडे यांच्या नावाची शिफारस केली होती. ती झाली नाही. असे रमेश कोंडे यांचे समर्थक सांगतात.
कोंडे जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी केलेले आंदोलन गाजले होते. त्यावेळी, पुणे जिल्हातील शिवसेनेचे दोन व काँग्रेसचे एका खासदारांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव न टाकल्यावरून जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध आंदोलन केले होते.
Web Title: Pune District Chief Ramesh Konde In Shinde Group
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..