शिंदे यांचे बंड बदलणार पुणे जिल्ह्याचेही राजकारण!

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचे परिणाम पुणे जिल्ह्याच्या राजकीय पटलावरही दिसणार आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSakal
Summary

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचे परिणाम पुणे जिल्ह्याच्या राजकीय पटलावरही दिसणार आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचे परिणाम पुणे जिल्ह्याच्या राजकीय पटलावरही दिसणार आहेत. शिंदे यांच्या बंडामागे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून होणारा त्रास, हे प्रमुख कारण दिले जात आहे. तेच कारण जिल्ह्यातही पुढे येण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेचे दोन दिग्गज नेते राष्ट्रवादीमुळे खिळखिळे झाले आहेत. त्यांना शिंदे यांच्या बंडामुळे संधी निर्माण झाली आहे.

सध्याची पुणे जिल्ह्याची राजकीय स्थिती पाहता ग्रामीण भागात आणि शहरात शिवसेनेचा एकही आमदार नाही. परंतु, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेचे स्थान निश्चितच भक्कम आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. तेव्हापासून शिवसेनेला उतरती कळा लागली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुरंदरमध्ये विद्यमान राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पराभवाचा झटका बसला. त्यामुळे शिवसेना पुरती कोलमडली. कारण, या दोन नेत्यांवरच जिल्ह्याच्या शिवसेनेची धुरा होती.

पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचा खरा वाद हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी निर्माण झाली आणि जिल्हा शिवसेनेच्या गोटात धडकीच भरली. कारण, पक्षाचे दिग्गज नेते असलेल्या आढळराव पाटील आणि शिवतारे या दोघांचा पराभव राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे झाला होता. आढळराव पाटील यांच्या विरोधात तर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे एकेकाळचे नेते असलेले डॉ. अमोल कोल्हे यांना मैदानात उतरवले आणि विजयी केले. तसेच, राष्ट्रवादीच्या विरोधात विशेषतः पवार कुटुंबीयांच्या विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका येणारे शिवतारे यांचा पराभव काँग्रेसच्या संजय जगताप यांनी केला असला, तरी त्यांना खरी रसद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुरवली. या दोन नेत्यांच्या पराभवामुळे शिवसेना खऱ्या अर्थाने बॅकफूटवर गेली. त्यात महाविकास आघाडी झाली आणि या दोन्ही नेत्यांना ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी भूमिका घ्यावी लागली.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खेड, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर, भोर, मुळशी, हवेली या तालुक्यांमध्ये शिवसेना हा भक्कम पक्ष आहे. पण, महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतरही या पक्षाचे राष्ट्रवादीकडून खच्चीकरण झाले. खेड पंचायत समिती स्पष्ट बहुमत असतानासुद्धा राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी तेथील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकली. जुन्नर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे, पण तेथेही राष्ट्रवादीकडून कुरघोडी सुरू आहे. शिरूर-हवेलीत विद्यमान आमदार अशोक पवार यांच्याविरोधात शिवसेना कायमच संघर्षाच्या भूमिकेत आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये आढळराव पाटील आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. तसेच, भोर-वेल्हे-मुळशी या तीन तालुक्यांचा असलेला भोर विधानसभा मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथेही शिवसेनेची मोठी ताकद आहे. येथे शिवसेनेचा वाद काँग्रेससोबत राष्ट्रवादीशी पण आहे. आगामी निवडणुकीमध्ये महाविकासआघाडी करायची की स्वतंत्र स्वतंत्र लढायचं, याचा विचार सुरू होता, पण आता चित्र पूर्ण बदलले आहे.

या सर्व परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदे यांची साथ देणार की ठाकरे परिवारासोबत राहणार, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. कारण, महाविकास आघाडीची सत्ता असताना एकनाथ शिंदे हेच पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांना वेळोवेळी ताकद देत होते. मग तो प्रश्‍न मंचर नगरपंचायतीच्या मंजुरीचा असेल किंवा विविध विकास कामांसाठी निधी देण्याचा. आढळराव पाटील हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये होते. त्यामुळे ते त्यांची साथ देणार की शिवसेनेचा भगवा कायम ठेवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघ कोणाकडे राहणार, हा महत्त्वाचा प्रश्‍न होता. तसेच, विजय शिवतारे हे कट्टर पवार विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे बंड हे त्यांच्यासाठी प्रकारची संधी मानली जात आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर व आंबेगाव या परिसरातील नागरिक विविध व्यवसाय व नोकरीनिमित्ताने ठाणे व नवी मुंबई परिसरात स्थायिक झालेले आहेत. तेथील राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. तसेच, या निमित्ताने त्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक आहे. त्याचाही परिणाम या तालुक्यातील राजकारणाव होऊ शकतो.

राहुल कुल, हर्षवर्धन पाटील यांना मोठी संधी

जर महा विकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भाजपचे सरकार आले, तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फार मोठे फेरबदल झालेले दिसतील. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये दौंडचे आमदार राहुल कुल येथे भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फार मोठी संधी असू शकते. तसेच, काँग्रेसला रामराम ठोकून भाजपचे झालेले इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांच्यावरही पक्ष मोठी जबाबदारी टाकू शकतो. विशेष म्हणजे राहुल कुल, हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे हे तीनही नेते बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करायची असेल; तर या नेत्यांना भाजप नक्कीच ताकद देणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे बंड पुणे जिल्ह्याचे राजकारण बदलवून टाकणारे ठरणार आहे. त्यामुळे आढळराव पाटील व शिवतारे हे काय भूमिका घेतात, यावर जिल्ह्याच्या राजकारणावर निश्चित परिणाम झालेले दिसतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com