जिल्ह्यातील विशेष ग्रामसभांत गुणवत्तावाढीची प्रतिज्ञा घ्या; झेडपी सीईओंचे सरपंचांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune zp

जागतिक जलदिनानिमित्त येत्या बुधवारी (ता.२२) पुणे जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune News : जिल्ह्यातील विशेष ग्रामसभांत गुणवत्तावाढीची प्रतिज्ञा घ्या; झेडपी सीईओंचे सरपंचांना पत्र

पुणे - जागतिक जलदिनानिमित्त येत्या बुधवारी (ता.२२) पुणे जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभांमध्ये ज्या गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण होऊन ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे, अशा गावांना ‘हर घर नल से जल’ असे या ग्रामसभांमध्ये घोषित केले जाणार आहे. शिवाय तसा ग्रामसभेचा ठराव केला जाणार आहे. मात्र यासोबतच सरपंचांनी आपापल्या गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावेत.

या विशेष ग्रामसभांमध्ये सरपंचांनी आपापल्या गावातील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या मदतीने शैक्षणिक ग्रामसभा आयोजित कराव्यात आणि या शैक्षणिक ग्रामसभांमध्ये गावांच्या सहभागाने निपुण भारत या गुणवत्तावाढीच्या कार्यक्रमाची प्रतिज्ञा घ्यावी, असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व सरपंचांना दिला आहे. सरपंचांनी आपापल्या गावात दर्शनी भागात निपुण भारत अभियानांतर्गत निश्‍चित करून देण्यात आलेले ध्येय, घोषवाक्य, या अभियानाचे उद्देश आणि वर्गनिहाय अध्ययन निष्पत्तीचे फलक लावावेत, असे आवाहनही आयुष प्रसाद यांनी सर्व सरपंचांना पत्राद्वारे केले आहे.

दरम्यान, या विशेष ग्रामसभांमध्ये, शाश्वत स्वच्छता असलेल्या आणि ओडीएफ प्लसचे ( ODF+) निकष पूर्ण केलेल्या गावांना स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत ‘हागणदारी मुक्त प्लस गाव म्हणू घोषित करावे. याबाबतचा ठराव ग्रामसभेत मंजूर करावा. अशा सूचना गावांना देण्यात आल्या आहेत. सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता असलेले व स्वच्छ भारत मिशनचे निकष पूर्ण केलेले ३२७ गावे आहेत.