Pune News : अमली पदार्थ प्रकरण : संवेदनशील माहिती असलेला गोपनीय अहवाल पोलिसांकडून सादर | pune drug case confidential report containing sensitive information is submitted by police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune drug case confidential report containing sensitive information is submitted by police

Pune News : अमली पदार्थ प्रकरण : संवेदनशील माहिती असलेला गोपनीय अहवाल पोलिसांकडून सादर

पुणे : अमली पदार्थ तस्कर टोळीबाबत संवेदनशील माहिती असलेला गोपनीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता आरोपींचे आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध असल्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांकडून न्यायालयास देण्यात आली.

पोलिसांनी सादर केलेला अहवाल एकूण तीन पानांचा आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात आणखी चार सदस्यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यातील दोन आरोपी इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान आणि हरिश्चंद्र पंत यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या दोघांसह यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची मोक्का कोठडीची मुदत सोमवारी (ता. २०) संपली. त्यामुळे एकूण १३ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी हा गोपनीय अहवाल सादर केला.

या गुन्ह्यात आत्तापर्यंत झालेल्या तपासावरून अटक टोळीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेफेड्रोन या अमली पदार्थाची निर्मिती, साठवण आणि वितरण याबाबतची माहिती तपासात उघड झाली आहे. या गुन्ह्यात प्रत्येक आरोपीचा सहभाग उघडकीस आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, या साखळीचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना मोक्का कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील विलास पठारे यांनी केला.

अमली पदार्थांच्या विक्रीतून पाच कोटी रुपयांची खरेदी

अटक आरोपींकडून आत्तापर्यंत दोन कोटी १४ लाख ३० हजार ६०० रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थाच्या विक्रीतून आरोपींनी विकत घेतलेले आठ किलो सोन्याची बिस्किटे. चार चाकी वाहने व महागडे मोबाईल फोन असा एकूण पाच कोटी ११ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीच्या वस्तू खरेदी केल्या आहेत.

कोठडीची कारणे सारखीच ः बचाव पक्ष

या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, मोक्का कोठडीसाठी देण्यात आलेली कारणे ही मागील रिमांडमधीलच आहेत. याच मुद्यांवर गेल्यावेळी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. त्यामुळे आता पुन्हा कोठडीची गरज नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.

या आरोपींना करण्यात आले होतो हजर

दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत आरोपी ललित पाटील, अरविंद लोहरे, भूषण पाटील, झिशान शेख, राहुल पंडित ऊर्फ रोहित कुमार, इम्रान शेख, शिवाजी शिंदे, हरिश पंत यांच्या मोक्का कोठडीत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दिला. तर, सुभाष मंडल, रौफ शेख, अभिषेक बलकवडे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी, प्रज्ञा कांबळे या पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

टॅग्स :Pune NewspolicecrimeDrug