Pune दिवाळी खरेदीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 traffic jams

विश्रामबागवाडा वाहतूक शाखा व महापालिका अतिक्रमण विभाग यांची संयुक्त कारवाई सुरू

Pune : दिवाळी खरेदीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणाची कारवाई

पुणे : दिवाळीच्या खरेदीसाठी मध्यवर्ती भागात होणारी कोंडी टाळण्यासाठी विश्रामबागवाडा वाहतूक शाखा व महापालिका अतिक्रमण विभाग यांच्यावतीने रविवारी सकाळपासून मध्यवर्ती भागात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. अद्याप तरी वाहतूक सुरळीत असून काही वेळानंतर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

दिवाळी सणाच्या खरेदीसाठी शनिवारी बाजार पेठेत मोठ्या प्रमाणत गर्दी झाली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, प्रभात रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, नदीकाठ रस्ता, महात्मा फुले मंडई परिसर, डेक्कन परिसर, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, रविवारी देखील मोठ्या प्रमाणत गर्दी वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन विश्रामबागवाडा वाहतूक शाखा व महापालिका अतिक्रमण विभाग यांच्यावतीने रविवारी सकाळपासून मध्यवर्ती भागात अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

वाहतुकीला व पादचाऱ्यांना अडथला ठरणाऱ्या पथारी व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्यात आली. कपडे, दिवाळीसाठी आवश्यक वस्तू, चप्पल, बुट, लहान मुलांची कपडे अशा विविध प्रकारच्या वस्तू अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत उचलण्यात आल्या.

या कारवाईमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ मोकळा होण्याबरोबरच वाहनांसाठी रस्ता मोकळा राहणार आहे, त्यामुळे रविवारी दिवसभर वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

याबरोबरच नो पार्किंग, वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने उचलून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. वाहतूक कोंडी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता अशा ठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत.