वाढत्या बांधकामांवर मर्यादा आणा!

वाढत्या बांधकामांवर मर्यादा आणा!
Published on: 

पुणे, ता. १७ : शहरातील वाढत्या बांधकामांवर मर्यादा आणण्यासाठी एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत (यूडीपीसीआर) बदल करावेत, अशी एकमुखी मागणी महापालिकेच्या पर्यावरण सभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी केली. या नियमावलीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असून, त्याचा पर्यावरणावर तसेच पायाभूत सुविधांवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.

पर्यावरण अहवालावरील चर्चेत शंभरहून अधिक नगरसेवकांनी सहभाग घेतला. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांचा समावेश करून पुढील वर्षी पर्यावरण अहवाल प्रसिद्ध करावा, असे आदेश सर्वसाधारण सभेने प्रशासनाला दिले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम यांनी यूडीपीसीआरच्या नियमांमध्ये बदल करून बांधकामांवर मर्यादा आणण्याची मागणी केली. त्याला सभागृहनेते गणेश बिडकर यांनीही दुजोरा दिला. बांधकाम नियमावलीत बदल करणे आवश्यक आहे. सध्या २० गुंठ्यांच्या जागेवर २२ मजली इमारत उभी राहत आहे. त्यामुळे त्या परिसरातील पायाभूत सुविधांवर मोठा ताण येत आहे. पूर्वी पुण्यात पश्चिमेकडून थंड वारे येत होते. मात्र, आता हे थंड वारेही येत नाहीत. शहरातील वाढत्या बांधकामांचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन नियमावलीचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे बिडकर यांनी नमूद केले.

दीर्घकालीन धोरणाची गरज
शहरातील टेकड्याफोड, वृक्षतोड, नद्यांमध्ये मिसळणारे सांडपाणी, हवेतील प्रदूषण आणि वाहनांची वाढती संख्या यावरही नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. नदीचे प्रदूषण रोखणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, टेकड्यांचे संरक्षण आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज नगरसेवकांनी अधोरेखित केली.


पाण्याचे नियोजन आवश्‍यक
महापौर मंजूषा नागपुरे यांनीही शहरात स्वच्छ आणि सुंदर वातावरण निर्माण करण्याबरोबरच पाणी बचतीवर भर देण्याची भूमिका मांडली होती. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आणि भविष्यातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पुणे हे स्वच्छ आणि सुंदर शहर झाले पाहिजे. येथील पर्यावरण चांगले राहिले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया, असे आवाहन महापौरांनी पर्यावरण अहवालाच्या निमित्ताने केले.

परदेश दौऱ्याचे दाखले
काही नगरसेवकांनी परदेश दौऱ्यांदरम्यान अनुभवलेल्या स्वच्छ शहरांचे आणि शुद्ध नद्यांचे दाखले दिले. परदेशातील शहरांमध्ये स्वच्छता, नदीचे प्रदूषण रोखणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा उल्लेख करत पुण्यातही अशा प्रकारचे बदल घडवून आणण्याची अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते काका चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते नितीन गावडे, उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह विविध पक्षांच्या नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला.

सूचनांचा अहवालात समावेश करा
पर्यावरण अहवालाला मान्यता देताना नगरसेवकांनी चर्चेदरम्यान मांडलेल्या सूचना आणि उपसूचनांचा त्यात समावेश करावा आणि त्यानुसार पुढील वर्षीचा पर्यावरण अहवाल प्रसिद्ध करावा, असे आदेश सर्वसाधारण सभेने प्रशासनाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.