

पुणे, ता. ५ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात धडक कारवाई केली. बाणेर, वानवडी, गणेश पेठ, देहू, कोथरूड, मुंढवा यांसह विविध भागांतील १२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये लाडू, बुंदी, तूप, मावा, बर्फी आणि अन्य खाद्यपदार्थांचा चार हजार २१ किलोहून अधिक साठा नष्ट आणि जप्त करण्यात आला. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही आस्थापनांचे व्यवसाय परवाने निलंबित आणि स्थगित करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत चार नोव्हेंबरला पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येथे एकाच वेळी कारवाई करण्यात आली. विभागातील २५ आस्थापनांची तपासणी करून नऊ हजार ३५९.७ किलो आणि १४१ लिटर खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून १२ आस्थापनांचे व्यवसाय परवाने निलंबित आणि स्थगित केले आहेत.
पुण्यातील गणेश पेठ परिसरात न्यू गायत्री ट्रेडर्स (पटेल घीवाला) येथे ३४३ किलो तूप जप्त केले. आवश्यक व्यवसाय प्रकाराची परवान्यात नोंद नसणे आणि अस्वच्छ परिस्थितीत पॅकिंग केल्याने या आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला. याच परिसरातील कुंदन डेअरी डिस्ट्रिब्युटर्सकडून एक हजार ७९६ किलो गायीचे तूप जप्त करण्यात आले. त्याची किंमत १३ लाख ४७ हजार रुपये आहे. वानवडीतील जय गणेश लाडूवाला येथे ४७३ किलो मोतीचूर लाडू आणि बुंदी, तर बाणेर येथील मनवार स्वीट्समध्ये ३८ किलो लाडू आणि बुंदी जप्त करण्यात आली.
परवाना, लेबलअभावी कारवाई
देहू येथील द्वारका स्वीट्समधून ३० किलो मावा नष्ट करण्यात आला. अयोग्य साठवणूक आणि लेबल नसल्याने ही कारवाई करण्यात आली. याशिवाय देहू येथील यशवंत मिल्क अॅग्रो प्रॉडक्टमधून १४१ लिटर तूप, एरंडवणे येथील उत्तम स्वीट्स, महंमदवाडीतील बिकानेर मिठाईवाले, कोथरूडमधील अन्नपूर्णा स्वीट्स आणि शिवाजीनगर येथील न्यू क्वॉलिटी डेअरी फार्ममधूनही खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. तळेगाव ढमढेरे येथील बालाजी ड्रायफ्रूट्समधील ३३३.५ किलो खाद्यपदार्थ जप्त करून त्यापैकी २५.५ किलो नष्ट करण्यात आले. मुंढवा येथील जनता स्वीट्सकडे वैध अन्नसुरक्षा परवाना नसल्याने व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.