

सणांच्या खरेदीत फॅशनचा नवा रंग
किंवा
घटस्थापनेपासून कपड्यांच्या खरेदीला वेग
इंट्रो
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाजारपेठांमध्ये कपड्यांच्या खरेदीला वेग आला आहे. घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नवरात्री, दसरा, दिवाळी आणि भाऊबीजेसाठी पारंपरिक पोशाखांना आधुनिक फॅशनची जोड मिळाली आहे. महिलांसाठी साड्या, चनिया-चोली, लेहेंगा, कुर्ती, तर पुरुषांसाठी कुर्ता, केडीयू, जॅकेट आणि इंडो-वेस्टर्न पोशाखांना मागणी आहे. लहान मुलांसाठीही आकर्षक फ्युजन कपड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. ‘फॅमिली लूक’, हलके कापड आणि आधुनिक डिझाइन यंदाच्या खरेदीचे ठळक वैशिष्ट्य ठरत आहे.
घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या दिवसांत कपड्यांच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. नवरात्री, दसरा, दिवाळी आणि भाऊबीज असे सलग सण असल्याने कुटुंबातील प्रत्येकासाठी नवीन कपडे घेण्याची लगबग बाजारपेठेत सुरू झाली आहे. सणाच्या निमित्ताने पारंपरिक पोशाखांना आधुनिक फॅशनची जोड मिळत असून, महिलांपासून पुरुष आणि लहान मुलांपर्यंत प्रत्येकासाठी विविध प्रकारचे कपडे उपलब्ध झाले आहेत.
महिलांमध्ये साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ती, लेहेंगा, अनारकली आणि इंडो-वेस्टर्न पोशाखांना मागणी आहे. पुरुषांसाठी कुर्ता-पायजमा, नेहरू जॅकेट, बंदी, केडीयू आणि इंडो-वेस्टर्न कुर्त्यांचे पर्याय आहेत. लहान मुलांसाठीही पारंपरिक पोशाखांसोबत फ्युजन कपड्यांची स्वतंत्र श्रेणी बाजारात आली आहे. विशेष म्हणजे कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना पूरक रंगांचे किंवा समान कापडातील कपडे निवडण्याचा ‘फॅमिली लूक’चा ट्रेंड वाढताना दिसत आहे.
यंदाच्या फॅशनमध्ये पारंपरिक पोशाखांना आधुनिक रूप देण्यावर भर आहे. ‘को-ऑर्ड सेट’, जॅकेट लेहेंगा, केप सेट, प्री-ड्रेप्ड साडी आणि इंडो-वेस्टर्न पोशाख ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. हलके कापड, मोठा घेर, मिरर वर्क, अजरख आणि बांधणीच्या छपाईला विशेष मागणी आहे. नवरात्रीत गरबा आणि दांडियासाठी कपडे निवडताना आकर्षक दिसण्यासोबतच ते वजनाने हलके आणि आरामदायी असावेत, याकडे तरुणींचा कल आहे. कॉटन आणि मलमलसारख्या हलक्या कापडांवर अजरख डिझाइन, डिजिटल बांधणी प्रिंट, रंगीत आरसे आणि गोटा यांचा वापर वाढला आहे. ‘गामठी’ पद्धतीच्या चनिया-चोलीसोबत डेनिम जॅकेट, वेगळ्या कटचे ब्लाउज, कॉलर किंवा लांब बाह्यांचे चोळी प्रकार यंदा पाहायला मिळत आहेत. काही डिझाइनमध्ये ओढणीऐवजी जॅकेटचा वापर करून पारंपरिक पोशाखाला आधुनिक रूप दिले जात आहे.
नवरात्रीच्या कार्यक्रमांसाठी साडीची निवडही नव्या पद्धतीने होत आहे. हलक्या वजनाची ऑर्गेन्झा, टिश्यू सिल्क, प्री-ड्रेप्ड आणि पँट-स्टाइल साड्यांना तरुणी पसंती देत आहेत. साडीला बेल्ट, हलके दागिने आणि आधुनिक ब्लाउजची जोड देऊन पारंपरिक आणि आधुनिक असा संमिश्र लूक साधला जात आहे. त्यामुळे साडीही गरबा आणि दांडियासाठी सहज वापरता येईल, अशा पद्धतीने निवडली जात आहे.
पुरुषांच्या पोशाखातही वैविध्य
नवरात्रीची फॅशन आता महिलांपुरती मर्यादित राहिलेली नाही. पुरुषांसाठी केडीयू, कुर्ता-पायजमा, धोती-पँट, शॉर्ट कुर्ता आणि जॅकेट सेट उपलब्ध आहेत. मिरर वर्क, बांधणी, पारंपरिक छपाई आणि भरतकाम असलेल्या केडीयूला गरबा-दांडियासाठी मागणी आहे. ऑनलाइन बाजारपेठेत नवरात्रीच्या कुर्त्यांच्या किमती सुमारे ४०० रुपयांपासून पुढे असून, मिरर वर्क असलेले केडीयू सेट सुमारे १,५०० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
‘मिनी गरबा लूक’चीही क्रेझ
मुला-मुलींसाठी नवरात्रीच्या खास पोशाखांची स्वतंत्र श्रेणी बाजारात आहे. मुलींसाठी मिरर वर्क चनिया-चोली, लहान घेराचे लेहेंगा, बांधणी प्रिंटचे पोशाख, तर मुलांसाठी केडीयू, कुर्ता-पायजमा आणि जॅकेट सेट उपलब्ध आहेत. पालकांकडून मुलांचे कपडे कुटुंबातील इतर सदस्यांच्या पोशाखाशी जुळणाऱ्या रंगात आणि डिझाइनमध्ये घेण्याचा कल वाढला आहे. मुलांचे पोशाख सुमारे ८०० रुपयांपासून उपलब्ध असून, त्यासोबत मॅचिंग दागिने आणि काही ठिकाणी लहान दांडियाही दिली जात आहे.
तुळशीबाग, लक्ष्मी रस्त्यावर खरेदीला वेग
तुळशीबाग आणि लक्ष्मी रस्ता हे पारंपरिक कपडे आणि साड्यांसाठी पुण्यातील प्रमुख खरेदी केंद्रांपैकी आहेत. तुळशीबागेत तुलनेने बजेटमधील कपडे, दागिने आणि नवरात्रीचे साहित्य उपलब्ध आहे, तर लक्ष्मी रस्त्यावर पारंपरिक तसेच ब्रँडेड कपड्यांचे पर्याय मिळतात. कॅम्पमधील फॅशन स्ट्रीटवर कमी किमतीतील ट्रेंडी कपड्यांना मागणी असते. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये कपड्यांसोबत मॅचिंग दुपट्टे, ब्लाउज, जॅकेट आणि ॲक्सेसरीजचे पर्याय दिले जात आहेत. काही ठिकाणी सवलत, जोड खरेदीवर ऑफर आणि उत्सवी दर जाहीर करण्यात आले आहेत.
पारंपरिक कपड्यांना पसंती
नवरात्रीनंतर दसरा आणि त्यानंतर दिवाळी व भाऊबीज असल्याने पुढील काही आठवड्यांसाठी कपड्यांची खरेदी सुरू आहे. साड्यांमध्ये पैठणी, सिल्क, चंदेरी, बनारसी, टिश्यू आणि कॉटन सिल्कचे प्रकार उपलब्ध आहेत. महिलांच्या पोशाखांमध्ये भरतकाम, मिरर वर्क, गोटा-पट्टी आणि सूक्ष्म प्रिंटला पसंती मिळत आहे. पुरुषांमध्ये कुर्त्यांसोबत जॅकेटचा पर्याय लोकप्रिय आहे. मुलांसाठी पारंपरिक कपड्यांना आधुनिक कट आणि रंगांची जोड दिली आहे. त्यामुळे विविध बजेटमध्ये खरेदीचे पर्याय उपलब्ध आहेत.
सुरत-अहमदाबादहून आवक
नवरात्रीच्या विशेष कपड्यांच्या पुरवठा साखळीत गुजरातमधील सुरतला महत्त्वाचे स्थान आहे. सुरतच्या रिंग रोड परिसरातील कापड बाजारातून चनिया-चोली, लेहेंगा, ड्रेस मटेरियल आणि महिलांचे उत्सवी कपडे देशभरातील विक्रेत्यांकडे पाठविले जातात. कॉटन, रेयॉन-कॉटन, मिल्की सिल्क, विविध प्रकारचे सिल्क आणि मिरर वर्क असलेले नवरात्री पोशाख या माध्यमातून पुण्याच्या बाजारात येत आहेत.
प्रदर्शनांमध्येही सणासुदीची खरेदी
सणासुदीच्या काळात कपडे, हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. देशभरातील कारागिरांच्या हातमाग साड्या, डिझायनर एथनिक सूट, हस्तनिर्मित वस्त्रे, ड्रेस मटेरियल आणि दुपट्ट्यांचे विविध संग्रह अशा प्रदर्शनांमध्ये पाहायला मिळतात. काही प्रदर्शनांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. कतान, मुल चंदेरी, शुद्ध सिल्क, कॉटन सिल्क, टिश्यू, टसर, रॉ सिल्क आणि प्रीमियम कॉटन यांसारख्या कापडांना येथे स्थान मिळत आहे. ‘कारागिरांकडून ग्राहकांपर्यंत’ थेट पोहोचणाऱ्या या विक्रीतून पारंपरिक विणकाम आणि हस्तनिर्मित वस्त्रांना शहरी ग्राहक मिळत आहेत.
ऑनलाइन बाजारपेठेचीही स्पर्धा
विविध ऑनलाइन व्यासपीठांवर महिलांसाठी चनिया-चोली, लेहेंगा, कुर्ती, साडी; पुरुषांसाठी कुर्ता व केडीयू; तर मुलांसाठी स्वतंत्र नवरात्री संग्रह उपलब्ध आहेत. हजारो पर्याय, विविध किंमत श्रेणी आणि सवलतींमुळे घरबसल्या खरेदी करणे सोपे झाले आहे. इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि छोट्या ऑनलाइन व्यवसायांमुळे ग्राहक थेट विक्रेत्यांशी संपर्क साधून कपड्यांची ऑर्डर देत आहेत. प्रत्यक्ष बाजारपेठेतील दुकानदारही समाज माध्यमांचा वापर वाढवत आहेत. नवीन स्टॉक, डिझाइन आणि सणासुदीचे संग्रह रील्स, छायाचित्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचविले जात आहेत.
भाड्याने घागरा घेण्याला पसंती
‘‘गेल्या ३० वर्षांपासून मी कपडे भाड्याने देण्याचा व्यवसाय करत आहे. नवरात्रीसाठी यंदा घागरा आणि लेहेंग्याची आगाऊ नोंदणी सुरू झाली असून, सध्या आमच्याकडे ४० हून अधिक घागरा-चोळीचे पर्याय उपलब्ध आहेत. एका दिवसाचे भाडे ५०० रुपये आहे. घागऱ्यासोबत नवरात्रीच्या दागिन्यांचा सेट हवा असल्यास त्यासाठी ७०० रुपये भाडे आकारले जाते. आम्ही दर दोन वर्षांनी अहमदाबादहून नवीन प्रकारचे घागरे आणि ज्वेलरी आणतो. हे कपडे प्रामुख्याने सणासुदीपुरते वापरले जात असल्याने ते खरेदी करण्याऐवजी भाड्याने घेण्याला नागरिकांची अधिक पसंती मिळत आहे,’’ असे शिंदे मेकअप सर्विसच्या शाहिस्ता तांबोळी यांनी सांगितले.
व्यापारी म्हणतात...
- विशाल शिंदे, सिलाई वर्ल्ड : ‘‘यंदा कोणते ट्रेंड लोकप्रिय आहेत, ग्राहकांची मागणी काय आहे, याचा विचार करूनच नवीन पर्याय बाजारात आणण्यावर आमचा भर आहे. पुरुषांसाठी रेडीमेड तसेच मापानुसार शिवून घेण्याचे दोन्ही पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत. प्रत्येक सणासाठी नवीन डिझाइन आणि कलेक्शन देण्याचा आमचा प्रयत्न असतो. सतत नवीन पर्याय उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांना त्यानुसार सवलती देणे, याचे आम्ही कायम पर्यंत करतो.’’
- केतन मेहता, बटरफ्लाय लहान मुलांचे दालन : ‘‘गेल्या ४० वर्षांपासून आम्ही लहान मुलांच्या कपड्यांचा व्यवसाय करत आहोत. दरवर्षी सणासुदीच्या काळात लहान मुलांसाठी विविध प्रकारचे पोशाख उपलब्ध करून देतो. यंदा मुलींसाठी ट्रेंडिंग प्लाझो सेटला चांगली पसंती मिळत आहे. हे कपडे वजनाने हलके आणि आरामदायी असल्याने पालकांकडून त्यांना मागणी आहे. इंडो-वेस्टर्न प्रकारातही मुला-मुलींसाठी विविध रंग आणि प्रिंटचे पर्याय उपलब्ध आहेत. यंदा कपड्यांच्या किमतीत साधारण १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.’’
- विजयसिंग सोनार : ‘‘नवरात्रीसाठी तरुण पिढीला आवडणारे ट्रेंडिंग घागरे, स्कर्ट, ओढण्या आणि त्याला साजेशी ज्वेलरी यंदा खास गुजरातमधून आणली आहे. पैंजण, बांगड्या, गळ्यातील दागिने, बिंदी यांसह विविध ॲक्सेसरीजही ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आम्ही दरवर्षी नवरात्रीच्या काळात गुजरातमधून पुण्यात येऊन तरुणाईला बदलते ट्रेंड आणि नवीन डिझाइन्स त्यांना उपलब्ध करून देतो.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.