esakal | Positive Story : एक फोन, अस्वस्थ डॉक्टर, आणि ऑक्सिजन उपलब्ध; रुग्णांना मिळाले जीवनदान

बोलून बातमी शोधा

Positive Story : एक फोन, अस्वस्थ डॉक्टर, आणि ऑक्सिजन उपलब्ध; रुग्णांना मिळाले जीवनदान
Positive Story : एक फोन, अस्वस्थ डॉक्टर, आणि ऑक्सिजन उपलब्ध; रुग्णांना मिळाले जीवनदान
sakal_logo
By
दिलीप कुर्हाडे

येरवडा : राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोज वाढतांना दिसतो आहे. सगळीकडे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांचे प्राण वाचवणारा प्राणवायू कमी पडल्याने अनेकांचे जीव जात आहेत. अशा परिस्थितीत असंख्य रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी शेकडो हात सरसावत आहेत. अशीच एक घटना चंदननगर येथील कोहकडे हॉस्पिटल मध्ये घडली.

कोहकडे हॉस्पिटलमधील डॉ. अंजली कोहकडे स्वत: कोरोना योद्ध्या बनून अनेकांना जीवनदान देत आहेत. पण वेळेने त्यांच्यावर देखील घाला घातला आणि हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणारा सगळा ऑक्सिजन साठाच संपला. हतबल झालेल्या डॉ. ज्योती यांनी तातडीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांना फोन केला आणि मदत करण्याची विनंती केली. डॉ. ज्योती अगदी कळकळीने सांगत होत्या आता जर ऑक्सिजन नाही मिळाला तर माझ्या दवाखान्यातील सर्वच रुग्ण दगावतील. अशा स्थितीत जेव्हा पुण्यात कुठेच साठा उपलब्ध नव्हता या दवाखान्यास ऑक्सिजन साठा उपलब्ध करून देणार कसा? हा प्रश्न यादव यांना सतावू लागला.

हेही वाचा: महाराष्ट्रासाठी खुशखबर! सर्वांना मिळणार मोफत लस

खणाणणारा फोन, हृदयाचे वाढलेले ठोके, जीवन मरणाची लढाई लढत असणारे कोविड रुग्ण आणि मदतीची याचना करणाऱ्या डॉ. ज्योती यांनी यादव यांना अखेर मार्ग दिसला आणि त्यांच्या एका संपर्कातील व्यक्ती कडून त्यांना माहिती मिळाली लोणी काळभोर येथे ऑक्सिजन उपलब्ध आहे. यादव यांनी तातडीने हालचाल करून रात्री ९ वाजता अखेर ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आणि ऑक्सिजन सिलेंडर थेट दवाखान्यात पोहच झाले. डॉ. ज्योती आणि अंजली कोहकडे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि जीवन मरणाच्या या लढाईत अखेर माणुसकीचा विजय झाला आणि अनेकांचे प्राण वाचले.

‘‘ त्या दिवशी कल्पेश यादव यांच्या प्रयत्नाने ऑक्सिजन उपलब्ध झाला. जर ऑक्सिजन मिळाला नसता तर अनेक रुग्णांचे प्राण गेले असते. यादव यांच्या प्रयत्नाने असंख्य लोकांचे जीव वाचले.’’

- डॉ. अंजली कोहकडे, प्रमुख डॉ. कोहकडे हॉस्पिटल, खराडी