ज्येष्ठ नागरिकाची सव्वा कोटीची फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची सव्वा कोटीची फसवणूक
Published on: 

पुणे, ता. १५ : कोल्हापूर येथील जागेच्या लिलावात सहभाग मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी १८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पैसे परत मागितले असता मोबाइलवर धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.
फिरोज खलील शेख (वय ४२) आणि फौजिया फिरोज शेख (दोघे रा. भवानी पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी देवेंद्र सरोजभाई शहा (वय ६५, रा. गंगाधाम फेज-२, मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शहा यांचा विश्वास संपादन करून लिलावात भाग घेण्यासाठी आरटीजीएसद्वारे एक कोटी १८ लाख रुपये घेतले. मात्र, लिलावात सहभाग न मिळाल्याने शहा यांनी रक्कम परत मागितली असता, त्यांना पैसे न देता उलट मोबाईलवर संदेशाद्वारे धमकी देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलिस करत आहेत.
----------------------------------
गुंतवणुकीच्या आमिषाने ६६ लाखांची फसवणूक
पुणे, ता. १५ : शेअर मार्केट आणि ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची ६६ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अज्ञात खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सय्यदनगर, हडपसर येथील एका ३७ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला. सुरुवातीला फिर्यादीने किरकोळ गुंतवणूक केली असता, आरोपींनी काही परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीने वेळोवेळी मोठी रक्कम गुंतवली; मात्र त्यावर कोणताही परतावा न देता मूळ रक्कमही हडप केली.
------
खराडीत २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या
पुणे, ता. १५ : अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून पैशांची मागणी केल्याने, खराडीत एका २२ वर्षीय तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी अजयकुमार भाटिया याच्यासह दोघांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिखर सक्सेना (वय २२, रा. रिव्हरडेल सूट सोसायटी, खराडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील कुमारगौरव सक्सेना (वय ४६, रा. हरिद्वार, उत्तराखंड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शिखर याला खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकविण्याची धमकी देऊन सातत्याने मानसिक त्रास दिला व पैशांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून शिखरने टोकाचा निर्णय घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
------
मुलाच्या अपहरणाचा बनाव रचून १५ लाखांची खंडणी
पुणे, ता. १५ : ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असून, त्याला सोडवायचे असल्यास १५ लाख रुपये द्या’, अशी धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ३४ वर्षीय व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मंगळवारी सायंकाळी फिर्यादीच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘तुमचा १४ वर्षांचा मुलगा माझ्याकडे आहे. तुम्हाला मुलगा पाहिजे असेल तर किती पैसे देणार?’ अशी विचारणा आरोपीने केली. त्यानंतर त्याने १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. घाबरलेल्या पालकांनी तत्काळ काळेपडळ पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मोबाईल क्रमांकाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात येत आहे.
------
बनावट ई-मेलद्वारे कंपनीची सात लाखांची फसवणूक
पुणे, ता. १५ : पुरवठादार कंपनीच्या ई-मेल आयडीशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेल पाठवून एका कंपनीची सात लाख नऊ हजार रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विशाल मुळे (वय ३९, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. मुळे यांच्या कंपनीने बायोगॅस प्रकल्पाचे साहित्य खरेदी करण्यासाठी सॅनमिश कंपनीकडे ७० लाख ९७ हजार रुपयांचे कोटेशन मागविले होते. दरम्यान, सायबर चोरट्याने मूळ ई-मेल आयडीच्या स्पेलिंगमध्ये किंचित बदल करून बनावट ई-मेलद्वारे बँक खात्याचे तपशील पाठवले. त्यावर विश्वास ठेवून कंपनीने १० टक्के आगाऊ रक्कम म्हणून सात लाख नऊ हजार रुपये संबंधित खात्यावर जमा केले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेण्यात आली.
--------
हत्याराच्या धाकाने पादचाऱ्याला लुटले
पुणे, ता. १५ : लक्ष्मी रस्त्यावर एका नागरिकाला हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. राहुल ऊर्फ नळ्या राजेंद्र लांडगे (वय ३३, रा. लोहियानगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी विनायक रामभाऊ चित्ते (वय ५४, रा. गंजपेठ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी चित्ते हे मंगळवारी (ता. १३) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाजवळून दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी आरोपीने त्यांना अडवून हत्याराचा धाक दाखवला. तसेच, जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशातील रोकड हिसकावून घेतली.
------
तरुणाला मारहाण करून लॅपटॉप चोरी
पुणे, ता. १५ : उलट दिशेने रिक्षा आणल्याचा जाब विचारल्याने चालकाने तरुणाला मारहाण करत लॅपटॉप व रोकड लुटल्याची घटना विमाननगर येथे घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी रिक्षाचालकासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दीपक बालाजी कांबळे (वय ३१, रा. खडकी) या तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हे रस्त्याने जात असताना एका रिक्षाचालकाने विरुद्ध दिशेने वाहन आणले. फिर्यादीने त्याला सुरक्षित चालवण्याबाबत विचारणा केली असता, रिक्षाचालकाने वाद घातला. त्यानंतर त्याने त्याच्या तीन साथीदारांना बोलावून घेतले. या चौघांनी मिळून कांबळे यांना मारहाण केली. तसेच, त्यांच्या खिशातील १० हजारांची रोकड आणि लॅपटॉप जबरदस्तीने हिसकावून नेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com