

Marigold and decorative flowers attract strong demand at Gultekdi Market Yard ahead of Padwa.
esakal
मार्केट यार्ड : दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर आता पाडव्याच्या मुहूर्तावर फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. घरगुती पूजाविधी, मंदिरांची सजावट आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी फुलांची खरेदी वाढल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फूलबाजारात सोमवारी (ता. ९) मोठी उलाढाल झाली. झेंडू, शेवंती, गुलछडी, अस्टर यांसह सजावटीच्या फुलांना विशेष मागणी होती. बाजारात झेंडूची तब्बल २१ हजार ३६० किलो आवक झाली. चांगल्या प्रतीच्या फुलांना समाधानकारक भाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पाडव्याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरांतील किरकोळ विक्रेते, फूलविक्रेते तसेच सजावट व्यावसायिकांनी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी केली होती.