
आळंदी : ‘‘तत्कालीन समाजात कर्मठपणा वाढला होता. त्यावेळी संतांच्या विचारांनीच सामाजिक प्रबोधन केले. विभागलेल्या समाजात आज चांगली राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी समानतेचे सूत्र बाळगणे गरजेचे आहे. समानतेची जीवनमूल्ये म्हणजे संतांनी समाजाला दिलेली मोठी देणगी आहे,'' असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आळंदीत केले.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाउंडेशनतर्फे आळंदी (ता. खेड) येथील एमआयटी महाविद्यालयात दोन दिवसीय पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाचा समारोप रविवारी डॉ. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते.
संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी, संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष माणिकबुवा मोरे, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम मोरे, संत चोखामेळा अध्यासनाच्या अध्यक्षा प्राचार्य उल्का चंदनशिवे, संमेलनाचे निमंत्रक सचिन पाटील, डॉ. ओम श्रीश श्रीदत्तोपासक, प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ व्यासपीठावर होते.
डॉ. मोरे म्हणाले, तेराव्या शतकात वारकरी साहित्य कळसाला पोहाचले होते. चोखाबांविषयी संत तुकोबाराय यांना अपार प्रेम होते. त्यांच्या काही रचनांमध्ये हा उल्लेख आवर्जून आढळतो. समकालीन संतांनाही चोखोबांविषयी आदर होता. ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय आणि चोखोबा यांचे कुटुंब भक्तीत रमले होते, असे संपूर्ण विश्वात पाहायला मिळणार नाही. हे नुसते साहित्य संमेलनच नाही तर नवा इतिहास मांडण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक साहित्यकाराचा स्वतंत्रपणे अभ्यास होणे गरजेचे आहे आणि हे कार्य संत चोखामेळा साहित्य संमेलनातून घडले आहे. प्रा. सोमनाथ लांडगे यांनी सूत्रसंचालन, तर माणिक महाराज मोरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.