

पुणे, ता. २१ : बनावट आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करताच परदेशात चार हजार ४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपयांचा निधी पाठविल्याचा प्रकार प्राप्तिकर विभागाच्या तपासात समोर आला आहे.
चार आर्थिक वर्षांत परकीय चलनातील १३ हजार ४०४ व्यवहारांना प्रमाणित केल्याप्रकरणी दोन सनदी लेखापालांवर (सीए) येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अंकुशकुमार सुरेशचंद बगरेचा (वय ३४, रा. कुमार पृथ्वी, कोंढवा) आणि मोहित शिवकुमार तोडी (वय ३३, रा. गगन सिग्नेट, कोंढवा बुद्रूक) अशी गुन्हा दाखल झालेल्या सनदी लेखापालांची नावे आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिकारी तन्मयी देसाई यांनी याबाबत फिर्याद दिली.
परदेशात निधी पाठविण्यासाठी किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहारांसाठी प्राप्तिकर विभागाचा ‘फॉर्म १५ सीबी’ आणि ‘१५ सीए’ ही प्रमाणपत्रे आवश्यक असतात. प्रमाणपत्रे देण्यापूर्वी संबंधित कंपनीचे व्यवहार, कागदपत्रे आणि बँक खात्यांची तपासणी करणे सनदी लेखापालांसाठी बंधनकारक असते. मात्र, बगरेचा आणि तोडी यांनी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कार्यालयातून कोणत्याही कागदपत्रांची किंवा खात्यांची शहानिशा न करता खोटी प्रमाणपत्रे तयार करून ती प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर सादर केल्याचा आरोप आहे.
बोगस कंपन्यांच्या नावाने व्यवहार :
प्राप्तिकर विभागाच्या तपासात ‘थॉमसन फ्रेट इंडिया’, ‘इमराल्ड फ्रेट’ आणि ‘झायलोस एअर अँड सी’ या कंपन्यांच्या नावाने परदेशात निधी पाठविल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांच्या पत्त्यांवर पाहणी केली असता कार्यालये बंद असल्याचे आढळले. त्यामुळे या कंपन्या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या बोगस कंपन्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
चार वर्षांत १३ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे :
२०२२ ते २०२६ या कालावधीत आरोपींनी १३ हजार ४०४ परकीय चलन व्यवहारांसाठी प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. व्यवहारांची पडताळणी न करता चार हजार ४२७ कोटी रुपयांहून अधिक निधी परदेशात पाठविण्यास मदत केल्याने देशाच्या परकीय चलन साठ्यावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक दीपक करंडे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.